भाजप नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या सोमवारी बालगंधर्व रंगमंदिरातील झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा वैशाली नागवडे यांच्यासह काही महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओच्या आधारे डेक्कन पोलिसांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या विरोधात भाजपच्या शिष्टमंडळाने डेक्कन पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेत कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली.
डेक्कन पोलिस ठाण्यात भस्मराज तीकोने, प्रमोद कोंढरे व मयूर गांधी या भाजपच्या ३ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण व त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलिसांनी तिघांवर कलम ३२३(मारहाण करणे), ३५४ (विनयभंग), ५०४, ५०६ आणि ३४ नुसार कारवाई केली आहे. त्यांना लवकरात लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.