File (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ४५चा आकडा पार होणार, मोदी हॅटट्रीक करणार; उद्योग पळवल्याची कोल्हेकुई - मुख्यमंत्री शिंदे

विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडलेल्या चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या टीकेचा समाचार घेतला.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई

येत्या लोकसभा निवडणुकीत देशात अब की बार ४०० पार आणि महाराष्ट्रात ४५ चा आकडा पार होईल, देशाच्या समृद्धीसाठी देशातील जनता मोदींना साथ देणार असून मोदी गॅरंटीमुळे मोदी आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक पूर्ण करतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत व्यक्त केला. मुंबईकरांना कोणत्याही पाणीकपातीला सामोरे जावे लागणार नसल्याचेही ते म्हणाले.

विरोधी पक्षाच्या वतीने विधानसभेत नियम २९३ अन्वये मांडलेल्या चर्चेला उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी आपल्या खास शैलीत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या टीकेचा समाचार घेतला. विरोधी पक्षाची एकच स्क्रीप्ट एकच ड्राफट असतो नवीन काहीच नसते. मुद्द्यावर टीका करा ना. मुद्दा नसला की अपशब्द वापरायचे. थयथयाट करायचा. पक्ष चोरला, चिन्ह चोरले म्हणून आरोप करता, पण स्वार्थासाठी विचार, भूमिका ज्यांनी विकली त्यांनी हे आरोप करू नयेत. आम्हाला खोके खोके म्हणणाऱ्यांनी आमच्याच शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी घेतले. त्याची चौकशी सुरू आहे. बाराही महिने विरोधकांनी राजकीय धुळवड करण्याचा विरोधकांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचे ते म्हणाले.

विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी देणे-घेणे नाही. विरोधी पक्ष कोमात गेला की काय, अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांना काय दिले त्याचा सभागृहात हिशोब तरी आमच्याकडून घ्यायचा होता. हे सरकार शेतकऱ्यांना कधी वाऱ्यावर सोडणार नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून मात करण्यात येत आहे. मुंबईकरांना देखील पाणीकपात होणार अशी चर्चा सुरू होती, पण त्यात तूर्तास मुंबईकरांना कोणतीही पाणीकपात केली जाणार नसल्याचा निर्णय घेतला आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उद्योग पळवल्याची कोल्हेकुई

उद्योग पळवल्याची कोल्हेकुई सुरू आहे. उलट उद्योजकांचा विश्वास वाढला आहे. उद्योगपतींना असुरक्षित वाटत होते ही ओळख आम्ही बदलली. दावोसला ३ लाख ७३ हजार कोटींचे एमओयू सही केले. राज्यात आणखीन २ लाख कोटीचे एमओयू झाले. साडेतीन लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. उद्योगात महाराष्ट्र पुढे आहे. हे उद्योग आल्यानंतर १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करू, असेही ते म्हणाले. राज्यभर रोजगार मेळावे होत आहेत. त्या माध्यमातून ४० हजार पेक्षा जास्त तरूणांना रोजगार मिळाले. ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचा २ कोटी ७२ लाख लोकांना फायदा झाला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत