मुंबई : पतीच्या वागण्यात सुधारणा करण्यासाठी पत्नीने पतीविरुद्ध खोटी तक्रार दाखल करणे ही क्रूरताच आहे. विवाहित जोडप्याने सामान्यपणे राखलेल्या सुसंवादी नातेसंबंधात अशा प्रकारच्या कृत्याला स्थान मिळवू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्वाळा देताना कुटुंब न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला.
महिलेने पती व सासरच्या लोकांविरुद्ध खोटी तक्रार दाखल केली होती. यामुळे पती व त्याच्या घरच्यांना मानसिक त्रास सहन करावा लावला. त्यामुळे महिलेचे कृत्य क्रूरतेसमान ठरते, असे निरीक्षण नोंदवत कुटुंब न्यायालयाने दाम्पत्याला घटस्फोट मंजूर केला होता. कुटुंब न्यायालयाचा हा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. पत्नीने पतीचे वर्तन सुधारण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली होती. तक्रारीत गंभीर आरोप केले होते. मात्र संसारात अशा खोट्या फौजदारी तक्रारींना स्थान देऊ शकत नाही, असे खंडपीठाने म्हटले आहे.
न्यायालय म्हणते
-विवाह ज्या पायावर उभा आहे, त्या आवश्यक मूल्यांना एकदा खोट्या आरोपांमुळे धक्का बसला की पती किंवा पत्नीने विवाहाची पवित्रता कायम ठेवण्यासाठी सर्व तर्कसंगतता गमावली हे निश्चित असते. त्यामुळे घटस्फोटाला अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
-पती-पत्नीपैकी कुणी एकाने फौजदारी खटल्याची कठोर कारवाई सुरु केली असेल तर ती कारवाई क्रूरता ठरते तसेच ती कारवाई हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३(१) (१ए) अन्वये घटस्फोटाचा आधार ठरते.