पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर ट्रस्टमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसावा, यासाठी डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी हे मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. नवी दिल्ली येथे रविवारी झालेल्या बैठकीनंतर डॉ. स्वामी यांनी याचिका दाखल करण्याचे जाहीर केले. स्वामी यांच्याकडून ७ ऑक्टोबरला विधिज्ञ सत्या सब्रवाल, विधिज्ञ विशेष कोनोडिया यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ ऑक्टोबरला डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी पंढरपूर येथे भेट देणार आहेत. या भेटीत ते वारकरी संप्रदाय व विठ्ठलभक्तांची बैठकही घेणार आहेत. विठ्ठल मंदिर समितीची वार्षिक उलाढाल ३५ कोटींच्या आसपास आहे. हे देवस्थान ताब्यात घेण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागलेली असते. हे वारकरी संप्रदायाचे तीर्थक्षेत्र असून श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर समितीला वेगळेच महत्त्व आहे.