महाराष्ट्र

उत्तम जानकर मविआसोबत? शरद पवारांशी चर्चा, मोहिते पाटील यांना साथ देणार?

माढा लोकसभा मतदारसंघ २०१९ मध्ये भाजपने काबीज केला होता. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माढ्यात विजयाचा झेंडा फडकवायचाच, असा निर्धार खुद्द शरद पवार यांनी केला...

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

माढा लोकसभा मतदारसंघ २०१९ मध्ये भाजपने काबीज केला होता. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माढ्यात विजयाचा झेंडा फडकवायचाच, असा निर्धार खुद्द शरद पवार यांनी केला. त्यासाठी प्रथम मोहिते पाटील यांना सोबत घेऊन धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देत भाजपला मोठा धक्का दिला. आता या मतदारसंघात अधिकाधिक मते कसे जुळवता येतील, यासाठी प्रयत्न सुरू असून, त्यासाठीच करमाळ्याचे नारायण पाटील यांच्यासह फलटणचे रघुनाथराजे निंबाळकर यांनाही सोबत घेतले. आता त्यांची नजर माळशिरसच्या भाजप नेते उत्तम जानकर यांच्यावर आहे. त्यांना आधीच भाजपने शब्द दिला. परंतु आज त्यांनी थेट शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे ते १९ तारखेला यावर निर्णय जाहीर करू शकतात. आता त्यावर या मतदारसंघातील सारे गणित अवलंबून आहे.

उत्तम जानकर यांना सोलापूर लोकसभेची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे ते भाजपमध्ये दाखल झाले. मात्र, ऐनवेळी त्यांनी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांना मैदानात उतरविले. त्यामुळे उत्तम जानकर भाजपवर नाराज झाले होते. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त करीत मोहिते पाटील यांना चुचकारले होते. त्यामुळे जानकरही मोहिते पाटील गटात गेल्यास भाजपचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर गोत्यात येऊ शकतात. याचा विचार करून फडणवीस यांनी त्यांच्यासाठी बारामतीत हेलिकॉप्टर पाठवून त्यांना नागपूरला बोलावून घेतले. तेथे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमवेत चर्चा केली. मात्र, परत आल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपसोबत जाण्यास विरोध केला. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात आपण १९ एप्रिल रोजी निर्णय घेऊ, असे जाहीर केले.

झाकल्या मुठीत काय?

बुधवारी सकाळी त्यांनी थेट पुणे गाठत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना आमदारकी देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते. यावेळी धैर्यशील मोहिते पाटीलही उपस्थित होते. त्यामुळे ही चर्चा सकारात्मक झाल्याचे समजते. मात्र, त्यानंतर पत्रकारांशी बोलताना उत्तम जानकर यांनी १९ तारखेलाच यासंबंधीचा निर्णय जाहीर करू, असे सांगितले आहे. त्यामुळे दोन दिवसांत ते काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

मोहिते पाटील यांना मिळणार साथ

उत्तम जानकर हे महत्त्वाचे नेते आहेत. सध्या त्यांची आम्हाला गरज आहे. ते नक्कीच साथ देतील, असा विश्वास माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. दरम्यान, उत्तम जानकर यांनीही मोहिते पाटील यांना साथ देण्याचे संकेत दिल्याचे समजते. परंतु ते १९ तारखेला काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

ताकद वाढणार

माळशिरस विधानसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांचे वर्चस्व आहे. परंतु याच मतदारसंघात उत्तम जानकर यांचीही ताकद मोठी आहे. या मतदारसंघात मोहिते पाटील जे ठरवतात, तोच आमदार होतो. त्यामुळे जानकर यांनाही मोहिते पाटील यांच्यासोबत राहणे फायद्याचे आहे. परंतु आधीच शब्द घेऊन सोबत गेल्यास फायदा होऊ शकतो, असे जानकर यांना वाटते. आता जानकर मोहिते पाटील यांच्यासोबत आल्यास माळशिरसमधून मोहिते पाटील यांना मोठी लिड मिळू शकते आणि त्याचे विजयात रुपांतर होऊ शकते. त्यामुळे उत्तम जानकर यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी