छायाचित्र - सलमान अन्सारी
मुंबई

बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आणखी एका आरोपीस बेड्या; बेलापूरमधून पोलिसांनी केली अटक

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी भगवतसिंग ओमसिंग या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बेलापूर येथून रविवारी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी भगवतसिंग ओमसिंग या आणखी एका आरोपीस गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी बेलापूर येथून रविवारी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांतील तो दहावा आरोपी असून त्याने मारेकऱ्यांना शस्त्रे आणून देण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केलेल्यांमध्ये गुरमेल बलजीत सिंग, धर्मराज राधे कश्यप, प्रविण रामेश्वर लोणकर, हरिशकुमार बालकमराम निशाद, नितीन गौतम सप्रे, संभाजी किशन पारबी, राम फुलचंद कनोजिया, प्रदीप दत्तू ठोंबरे आणि चेतन दिलीप पारधी यांचा समावेश असून त्यांच्याकडून तीन पिस्तूल, तीस जिवंत काडतुसे, तीन मॅगझीन, पाच मोबाईल, दोन आधारकार्ड आदी मुद्देमाल जप्त केला आहे. हे सर्व आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या आरोपींच्या चौकशीतून भगवतसिंग याचे नाव समोर आले होते. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरू असताना रविवारी सकाळी अकरा वाजता भगवतसिंगला बेलापूर येथून पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या गुन्ह्यात त्याचा सहभाग उघडकीस येताच त्याला पोलिसांनी अटक केली. त्याला दुपारी किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला शनिवार, २६ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तपासात भगवतसिंग हा नवी मुंबईतील बेलापूर, पोलीस कॉलनी रोड, सेक्टर एकच्या प्लॉट क्रमांक सातमध्ये राहत असून त्याचे तिथेच भंगाराचे दुकान आहे. त्याने शस्त्रे मुंबईपर्यंत पोहचविण्यास महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. या गुन्ह्यांतील पाहिजे आरोपीच्या तो संपर्कात असल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी