खड्ड्यात रस्ते की रस्त्यांत खड्डे हा प्रश्न दरवर्षी पावसाळ्यात चर्चेचा विषय ठरतो. पुढील दोन दिवसांत वरुणराजा बरसणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पावसाच्या तोंडावर मुंबई महापालिकेला खड्ड्यांची आठवण झाली आहे. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील खड्डे बुजवण्यासाठी १३२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून पालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, वॉर्डनिहाय खड्डे बुजवण्यासाठी २४ वॉर्डांना ५० लाख रुपये देण्यात आले आहेत.
खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च केले. मात्र आजही रस्त्यांवरील खड्डे सुस्थितीत असून पावसाळ्यात तर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरते. गेल्या काही वर्षांपासून खड्डे बुजवण्यासाठी ‘कोल्डमिक्स’ या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. मात्र याचा परिणाम तितकासा होत नसल्याने पालिकेला खड्ड्यांवरून खडे बोल सुनावले जातात. त्यामुळे यंदा पालिकेने खड्डे बुजवण्यासाठी ‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ आणि ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
१५ मिनिटांत वाहतूक सुरू
‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ तंत्रज्ञानात केमिकल व डांबराचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे वाहनांच्या टायरला रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट चिकटणार नाही. तसेच खड्डा बुजवल्यानंतर पुढील १५ मिनिटांतच या रस्त्यावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. विशेष म्हणजे पाऊस सुरू असतानाही या तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे.
अशी होणार कामे!
खड्डे बुजवण्याच्या कामात शहर विभागातील काम ‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ने काम केले जाणार आहे. एच पूर्व, एच पश्चिम सांताक्रुझ-वांद्रे, एल कुर्ला, एम पूर्व-पश्चिम चेंबूर, गोवंडी, एन घाटकोपर, एस भांडूप, टी मुलुंड आणि आर/मध्य बोरिवली, आर/उत्तर दहिसर, के/पूर्व-पश्चिम अंधेरी, पी/उत्तर मालाड, पी/दक्षिण कांदिवली, आर/दक्षिण कांदिवली येथील रस्त्यांची कामे ‘रिअॅक्टिव्ह अस्फाल्ट’ने केले जाणार आहे. तर के/पूर्व-पश्चिम, पी/दक्षिण, आर/दक्षिण, आर/मध्ये, आर/उत्तर, पी/उत्तर, झोन-५ आणि ६ या ठिकाणी ‘रॅपिड हार्डनिंग काँक्रिट’नेही काम केले जाणार आहे.