मुंबई

राज्यातील मराठा आंदोलनप्रकरणी १४९ गुन्हे दाखल

बीडमध्ये रॅपिड ॲॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोलंकी यांची घरे पेटविण्यात आली होती.

नवशक्ती Web Desk

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात सुरू असलेल्या दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनेची राज्य पोलीस दलाने गंभीर दखल घेतली आहे. अशाप्रकारे दंगल घडविणाऱ्या लोकांविरुद्ध पोलिसांनी एकूण १४७ गुन्हे दाखल केले आहेत. त्यात दंगलीसह हत्येचा प्रयत्न केल्याच्या सात गुन्ह्यांचा समावेश आहे. याच प्रकरणात आतापर्यंत १६८ जणांना पोलिसांनी अटक केली तर १४६ जणांना कलम-४१ अंतर्गत नोटीस बजाविण्यात आल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

दरम्यान, मराठा समाजाने राजकीय नेत्यांना टार्गेट केल्याने काही आमदारांसह नेत्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी राज्य पोलिसांकडून योग्य ती खबदारी घेतली जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी शांततेत आंदोलन पार पडले तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

संभाजीनगरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचे आतापर्यंत उघडकीस आले आहे. त्यामुळे याप्रकरणी ५४ गुन्हे दाखल झाले असून याच गुन्ह्यांत १०६ आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. बीडमध्ये २० गुन्ह्यांची नोंद होऊन तिथे पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी संभाजीनगर ग्रामीण, जालना आणि बीडमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. मराठा आरक्षणावरून झालेल्या हिंसक आंदोलनामुळे विविध ठिकाणी तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती. त्यात १२ कोटी रुपयांच्या शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात १७हून अधिक एसआरपीएफच्या कंपन्या तैनात करण्यात आल्या असून त्यांच्या मदतीला होमगार्डचे ७ हजार जवान देण्यात आले आहेत.

बीडमध्ये रॅपिड ॲॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. बीडमधील आमदार संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोलंकी यांची घरे पेटविण्यात आली होती. मुंबईत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीचे नुकसान करण्यात आले होते. त्यापूर्वी आंदोलकांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या कारचे नुकसान केले होते. या सर्व घटनांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

UPSC उमेदवार पडताळणीसाठी AI ची मदत घेणार

Mumbai-Ahmedabad Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग; घणसोली-शीळफाटा दरम्यान पाच किमीचा बोगदा पूर्ण

Kalyan-Dombivli : रहिवाशांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई - शिंदे

संघर्षाची सुरुवात व शेवट कसा करायचा हे भारताकडून शिकावे! हवाई दलप्रमुख ए.पी. सिंग यांचे प्रतिपादन

आत्मनिर्भर भारतच देशाची शक्ती - मोदी