मुंबई

राज्यात पुन्हा सत्तासंघर्ष पेटणार, शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार ?

प्रतिनिधी

दिवाळी वर्षातून एकदाच येते, पण राजकारणातले फटाके कोणत्याही वेळी फुटत असतात. असे म्हणत शिवसेनेने पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. “शिंदे गटाचे किमान २२ आमदार नाराज असून, यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपमध्ये विलीन करून घेतील. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असा खोचक सवाल शिवसेनेने विचारला आहे.

“शिंदे यांचा रामदास आठवले होईल, हे त्यांच्याच गटातील एका नेत्याने खासगीत केलेले विधान बोलके आहे. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. शिंदे यांनाही उद्या भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल व त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील, हे भाजपचे नेते सांगत आहेत. मग शिंदे यांनी काय मिळवले? पोलीस खात्याच्या बदल्यांवरून नाराज होऊन मुख्यमंत्री सातारा येथील आपल्या गावी निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले. ते तितकेसे खरे वाटत नाही. भाजपच्या मेहेरबानीवर त्यांचे मुख्यमंत्रिपद टिकून आहे आणि शिंदे यांचे राजकीय अस्तित्व मुख्यमंत्रिपदावरच टिकून आहे,” असा टोलाही शिवसेनेने लगावला.

“४० आमदारांच्या हट्टापुढे आपले मुख्यमंत्री हतबल आहेत. इतर आमदारांची कामे होत नाहीत. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. भाजपने शिंदे व त्यांच्या काही लोकांना ‘ईडी’च्या फासातून तूर्त वाचवले, मात्र कायमचे गुलाम करून ठेवले. सरकारचे सर्व निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतात व मुख्यमंत्री शिंदे ते निर्णय जाहीर करतात. आता मुख्यमंत्र्यांना न विचारताच फडणवीस दिल्लीला जातात,” असा टोलाही त्यांनी हाणला.

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात दुपारी ३ वाजेपर्यंत किती टक्के मतदान ? बघा संपूर्ण आकडेवारी

लातूर आणि माढा मतदारसंघातील EVM मशीनमध्ये बिघाड; २० ते ४५ मिनिटे मतदान खोळंबले

मराठी "not welcome" म्हणणार्‍या लोकांना कृपया मत देऊ नका; रेणुका शहाणेंची पोस्ट चर्चेत

मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी; म्हणाल्या...

'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर