मुंबई : जोगेश्वरी येथील मजासवाडी येथे बुधवारी सकाळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमधून वीट खाली पडून एका २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. संस्कृती अमीन असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या तरूणीचे नाव असून ती २२ वर्षांची होती.
संस्कृती ही जोगेश्वरी पूर्वेच्या मजासवाडी येथे आईवडिलांसह रहात होती. तिच्या वडिलांचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. संस्कृती हिने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला असून नुकतीच ती एका खासगी बँकेत रुजू झाली होती. सकाळी नेहमीप्रमाणे ती कामावर जाण्यासाठी निघाली होती.
दरम्यान, मजासवाडीच्या धोबीघाट परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. संस्कृती याच इमारतीच्या खालून जात होती. त्यावेळी साडेनऊच्या सुमारास इमारतीवरून सिमेंटची वीट (ब्लॉक) संस्कृतीच्या डोक्यावर पडली. ती बेशुध्द होऊन खाली पडली. तिला उपचारासाठी जवळच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. वीट डोक्यात पडल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे संस्कृतीचा मृत्यू झाल्याचे समजते.