मुंबई

फेमा कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी वेंकटेश्वरा हॅचरीजच्या ९ मालमत्ता जप्त

या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडून सुरू आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘ईडी’ने वेंकटश्वरा हॅचरीज प्रा. लिमिटेडच्या (व्हीएचपीएल) महाराष्ट्र व कर्नाटकातील ९ मालमत्ता जप्त केल्या आहेत. या मालमत्तांचे मूल्य ६५.५३ कोटी रुपये आहे. ही कंपनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी संबंधित असल्याचे कळते. यापूर्वी शरद पवार यांच्याशी संबंधित जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ‘ईडी’ने छापे टाकले होते.

२०११ पासून आतापर्यंत कंपनीने केलेल्या अवैध निधी पाठवल्या प्रकरणाची ‘ईडी’ने चौकशी करायला सुरुवात केली आहे. या कंपनीने त्यांचीच उपकंपनी मेसर्स वेंकीज ओव्हरसीज लिमिटेड (व्हीओएल), यूके यांना निधी पाठवला.

मेसर्स वेंकीज लिमिटेडचा कृषी व कुक्कुटपालनाचा व्यवसाय असल्याचे आरबीआयसमोर जाहीर केले. त्यानंतर मेसर्स व्हीएचपीएलने मोठ्या प्रमाणात व्हीओएलला मोठ्या प्रमाणात निधी पुरवला. मात्र, व्हीओएलने गेल्या ११ वर्षांत कोणताही व्यवसाय केला नाही.

मेसर्स व्हीएचपीएलने ६५.५३ कोटी रुपये व्हीओएलला पाठवले असून त्याचा तपास ‘ईडी’ने सुरू केला आहे. व्हीओएलने हा निधी मिळाल्यावर इंग्लंडमध्ये अचल मालमत्ता खरेदी केली. तिचे नाव ‘अलेक्झांडर हाऊस’ असे केले आहे. ही जागा ९० एकर परिसरात पसरली आहे.

मेसर्स व्हीएचपीएलने व्हीओएलला पाठवलेल्या निधीचा उपयोग हा व्हीओएलने बार्कलेज बँकेचे कर्ज फेडायला केला होता.

तपासणीत असे आढळले की, मेसर्स व्हीएचपीएलचा तिच्या उपकंपनी मेसर्स व्हीओएलद्वारे व्यवसाय करण्याचा कोणताही हेतू नव्हता. व्हीओएलचे संचालक, कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्यांच्या आनंदासाठी इंग्लंडमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आली.

कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ‘ईडी’ने फेमा कायद्याच्या ३७ अ कलमानुसार तितक्याच रकमेची मालमत्ता भारतात जप्त केली. या प्रकरणाचा तपास ‘ईडी’कडून सुरू आहे.

Mumbai News : ठाणे-कल्याण मार्गावरील लोकलची गर्दी कमी होणार? मध्य रेल्वेचा ‘गेमचेंजर’ ठरू शकणारा जबरदस्त प्लॅन

महिला डॉक्टरचा हिजाब ओढला; नितीश कुमारांवर टीकेची झोड, "तुमची तब्येत ठीक नसेल तर...

लाइक, कमेंट अन् व्हायरल! Insta रिल्समुळे २० वर्षांच्या तरुणाला थेट IPL लिलावात एंट्री? कोण आहे इझाझ सावरिया?

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने किडनी विकली; रोहित पवार आक्रमक, "या निर्दयी सरकारवर...

National Herald Case : नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय? २०१२ पासून आजपर्यंत काय घडलं?