भालचंद्र चोरघडे / मुंबई
घरासाठी खरेदीदारांकडून असलेली वाढती मागणी, तयार घरांची वाढती संख्या तसेच वाणिज्यिक व निवासी मालमत्तेकरिता असलेली ग्राहकांची पसंती यामुळे आर्थिक राजधानीतील स्थावर मालमत्ता क्षेत्रात अभूतपूर्व वाढ होत असल्याचे विकासकांची संघटना क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डाॅमनिक रोमेल यांनी म्हटले आहे.
एफपीजेतर्फे एफपीजे कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापात रोमेल बोलत होते. कर्जासाठीचे व्याजदर तसेच मुद्रांक शुल्क अशी आव्हाने असली तरी मुंबईच्या स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करण्यासारखी सुवर्णसंधी नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईतील गृहबांधणी व्यवसाय हा कालांतराने अपेक्षेपेक्षा उत्तम कामगिरी करत राहील, असा विश्वास व्यक्त करतानाच रोमेल यांनी, मासिक वाढ लक्षात घेता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घर खरेदीचे व्यवहार अधिक राहतील, असा दावाही केला. बँकांचे कर्ज तसेच नोंदणी शुल्काकरिता अधिक रक्कम खर्ची करावी लागत असली तरी तुलनेत स्थावर मालमत्ता क्षेत्र यापूर्वीचे सर्व विक्रम मागे टाकेल, असेही ते म्हणाले.
रोमेल म्हणाले की, सुशिक्षित ग्राहक घरांच्या खरेदीबाबत सजग आहेत. महारेरामुळे ग्राहक हे त्यांच्या अधिकाराबाबत अधिक जागरूक आहेत. परिणामी विकासकांनाही गृहनिर्मिती दरम्यान दर्जा राखण्याबाबत पालन करावे लागते. यामुळे स्थावर मालमत्ता हे क्षेत्र अधिक पारदर्शक बनले असून या क्षेत्रात खरेदीदार हे योग्य निर्णय घेऊ शकतात.
मुंबई शहरात उच्च दर्जाच्या मालमत्तेची ग्राहकांची मागणी वाढली असल्याने उपनगरातील घरांसाठी मुंबईकरांची पसंती राहिली असल्याचे रोमेल यांनी खरेदीदारांच्या कलाबाबत स्पष्ट केले. पश्चिम उपनगरातील गोरेगाव, अंधेरीसारख्या भागात ग्राहक हे घरखरेदीला प्राधान्य देत असल्याचेही ते म्हणाले. येथील जागांचे दर हे मुंबई शहरातील वांद्रे येथील घरांच्या दरासमकक्षच असल्याचा दावाही त्यांनी केला.
घराजवळ काम या मुंबईकरांच्या प्राधान्यकलामुळे हे घडत असल्याचे नमूद करत रोमेल यांनी, मुंबईकर वेळेची बचत करण्यास प्राधान्य देत असल्याने उपनगरातील घरांसाठी मागणी वाढत असल्याचे नमूद केले. यामुळेच भागात निवासी मालमत्तेचा विकासही होत असल्याचे ते म्हणाले.
दक्षिण मुंबईसारख्या भागातील घरे हे ग्राहकांसाठी आव्हान असल्याचे नमूद करत रोमेल यांनी, या परिसरात एक लाख रुपये प्रति चौरस फूट जागेचे दर आहेत, अशी माहिती दिली. येथील घरांचा पर्याय अनेकांसाठी आवाक्याबाहेर असल्याचेही ते म्हणाले. उपनगरातील मोठ्या घरांसाठीची मागणी वाढत असल्याचे नमूद करत रोमेल यांनी वाढत्या कुटुंबामुळे घर खरेदीदार अशा घरांना पसंती देतात, असे सांगितले. घरांसाठी मोठी जागा तसेच त्याची किंमत हेदेखील खरेदीदारांसाठी महत्त्वाचे निकष गृहित धरले जातात, असे रोमेल यांनी सांगितले.