मुंबई

मुंबईकरांना काय मिळणार? पालिकेच्या अर्थसंकल्पाकडे सामान्य नागरिकांचे लक्ष

प्रतिनिधी

यंदा २०२३-२४चा अर्थसंकल्प २ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचे प्रशासक व आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल मांडणार आणि तेच मंजुरी देणार आहेत. त्यात यंदाचा अर्थसंकल्प हा आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सादर होणार असल्याने आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी भरीव तरतूदीची घोषणा होणार आहे. परंतु प्रत्यक्षात मुंबईकरांच्या पदरी काय पडणार, हे २ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेकडून मुंबईकरांच्या पदरी प्रत्यक्षात काय पडणार, याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात आरोग्यावर १८०० कोटींची वाढ करण्यात आल्याने एकूण ६६२४.४१ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यंदाही यात वाढ होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या ४५९४९.२१ कोटींच्या अर्थसंकल्पात यावर्षीही सुमारे साडेचार हजार कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी एकूण बजेटपैकी तब्बल १५ टक्के तरतूद आरोग्यावर करण्यात आली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठीही विशेष तरतूद व नव्या योजना जाहीर करण्याची शक्यता आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे ४ फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्प सादर करणे नियमानुसार आवश्यक आहे. यंदा ४ व ५ फेब्रुवारीला सुट्टी असल्याने २ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत गेल्या वर्षी ७ मार्च रोजी निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्पाने ८ मार्चपासून प्रशासकाच्या हाती कारभार गेला आहे. त्यानंतरच्या काळात आतापर्यंत पालिका निवडणूक झालेली नाही. त्यामुळे प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या माध्यमातूनच अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुंबईचा २०२३-३४चा अर्थसंकल्प तब्बल ३६ वर्षांनी प्रशासकाच्या माध्यमातून मांडला जाणार आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस