मेघा कुचिक/मुंबई
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याच्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आणखी एक महत्त्वपूर्ण पुरावा हस्तगत केला आहे. वांद्रे तलावाजवळ चाकूचा तिसरा भाग पोलिसांना सापडला आहे. घटनेनंतर, वांद्रे रेल्वे स्थानकाकडे जात असताना तलावाजवळ आरोपीने चाकूचा हँडल फेकून दिला होता. तो हँडल पोलिसांनी बुधवारी जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. त्यात बोटांचे ठसे, आरोपीची टोपी, रक्ताने माखलेले कपडे, मोबाईल फोन, इयरफोन्स, चाकूचे दोन भाग आणि आता चाकूचा तिसरा भाग यांचा समावेश आहे. या पुराव्यांमुळे खटल्याला बळ मिळण्याची शक्यता आहे.
घटनेदरम्यान झटापटीत चाकू तीन भागांमध्ये तुटला. एक भाग अभिनेत्याच्या पाठीच्या कण्यामध्ये अडकला. दुसरा भाग पंचनाम्याच्या वेळी त्यांच्या निवासस्थानी सापडला. तर तिसरा भाग, जो हरवलेला होता, तो बुधवारी सापडला. बुधवारी, सायंकाळी ५ वाजता, वांद्रे पोलिसांनी आरोपी मोहम्मद इस्लाम (वय ३०) याला वांद्रे तलावाकडे नेले. हा तलाव वांद्रे रेल्वे स्थानकाजवळ आहे. तपासासाठी फॉरेन्सिक मोबाइल व्हॅन देखील घटनास्थळी नेण्यात आली.
आरोपी बेकायदेशीररित्या भारतात आल्याची शक्यता
पोलिसांनी सांगितले की, आरोपी बांगलादेशातून बेकायदेशीररित्या भारतात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपीची आई आणि दोन भाऊ बांगलादेशात राहतात. तो मोठ्या प्रमाणावर पैसे आईला पाठवत असे, तर स्वतःकडे फारच थोडे पैसे ठेवत असे. मात्र, सध्या तो बेरोजगार असून त्याने पैसे पाठवणे बंद केले होते. पोलिसांच्या मते, आरोपी एकटा राहणारा होता आणि इतरांशी फारसा संवाद साधत नसे.
सैफने घेतली रिक्षा चालकाची भेट
सैफ अली खान चाकू हल्ल्यात जखमी झाल्यानंतर त्याला आपल्या ऑटो रिक्षातून तत्काळ रुग्णालयात घेऊन जाणारा रिक्षा चालक भजन सिंग राणा यांची सैफने भेट घेतली. केलेल्या मदतीबद्दल सैफने त्यांचे आभार मानले. तसेच कधी गरज भासल्यास मदत करण्याचे आश्वासनही सैफ याने दिले.