मुंबई : बोगस नंबर प्लेट लावून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी वसीम सिराबक्श शेख या ४१ वर्षांच्या बँक मॅनेजरला ओशिवरा पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, याच गुन्ह्यांत त्याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. ऍक्टिव्हाचा नंबर प्लेट स्कूटीवर लावून वसीम शेखने शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अक्षय प्रकाश लादे हे ओशिवरा वाहतूक विभागात पोलीस शिपाई म्हणून काम करतात. गेल्या आठवड्यात ते त्यांच्या सहकाऱ्यासोबत जोगेश्वरीतील न्यू लिंक रोड, स्मशानभूमीजवळ कर्तव्य बजावित होते. यावेळी एक व्यक्ती विना हेल्मेट स्कूटी चालवत होता. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून त्याच्याकडे स्कूटीचे कागदपत्रे मागितले.
यावेळी त्याने दुसऱ्याच क्रमांकाचे कागदपत्रे दाखवून वाहतूक पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे पोलिसांना आणखीन एक नंबर प्लेट सापडले. ई-चलनद्वारे दंडात्मकदरम्यान हा क्रमांक एका होंडा ऍक्टिव्हाचा होता. अनिता श्रीराम यादव या महिलेच्या मालकीच्या या ऍक्टिव्हाचा नंबर प्लेट त्याने त्याच्या स्कूटीवर लावला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध ओशिवरा पोलिसात तक्रार करण्यात आली होती.