मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तारले जात असून मेट्रो रेल स्थानक ते इच्छित स्थळी ये-जा करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने आता दहिसर-मिरा रोड दरम्यान बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सोमवार, १३ फेब्रुवारीपासून ही बस सेवा प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध होणार असून दहिसर मेट्रो स्थानक आणि मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान काशिमिरा, सिल्वर पार्क, जम्मू काश्मीर बँक मार्गे नवीन विशेष बस मार्ग क्र. पीपीएस-१ सुरू करण्यात येणार आहे. या बस मार्गावरील बस दहिसर मेट्रो स्थानक-मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान दहिसर चेकनाका-काशिमिरा-सिल्वर पार्क-जम्मू काश्मीर बँक-मिरा रोड रेल्वे स्थानक (पूर्व) दरम्यान धावेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.
बेस्ट उपक्रमाकडून मेट्रो रेल प्रवाशांसाठी बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पश्चिम उपनगरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने दहिसर आणि गुंदवली- अंधेरी (पूर्व) दरम्यान ‘मेट्रो रेल -७’ सुरू करण्यात आली असून दहिसर आणि एसिक नगर अंधेरी (पश्चिम) दरम्यान मेट्रो रेल-२ बस सेवा सुरू करण्यात आली आहे. मेट्रोतून उतरल्यानंतर आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या नियमित बस उपलबध आहेत. नवीन बस मार्ग सोमवारपासून कार्यान्वित करण्यात येत आहे.
सोमवारपासून या बस मार्गावर पहिली बस मागाठाणे आगार येथून सकाळी ७ वाजता सुटेल व शेवटची बस रात्री १० वाजता सुटेल. मीरा रोड स्थानकातून पहिली बस सकाळी ७. ४५ ला सुटेल व शेवटची बस रात्री १०.४५ वाजता सुटणार आहे. या विशेष बससेवेसाठी सरसकट २५ रुपये प्रवास भाडे आकारण्यात येणार आहे