ऊर्वी महाजनी/मुंबई
मिथेन वायू हा आरोग्यासाठी घातक आहे. कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून निघणाऱ्या मिथेन वायूवर रिअल-टाइम लक्ष ठेवा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. या डम्पिंग ग्राऊंडमुळे मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, विशेषतः मिथेन वायूच्या धोक्यावर न्यायालयाने चिंता व्यक्त केली असून रात्री १ ते ६ या वेळेत येणाऱ्या दुर्गंधीचा अभ्यास करावा तसेच प्रदूषण पातळीची माहिती देणारा डिस्प्ले बोर्ड डम्पिंग ग्राऊंडवर लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधून येणारी दुर्गंधी आणि प्रदूषण यावर मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र चिंता व्यक्त केली. या ठिकाणाहून होणारे मिथेन वायूचे उत्सर्जन आणि प्रदूषणावर रिअल-टाइम देखरेख करण्याचे तसेच त्याचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) प्रशासनाला दिले आहेत. पूर्व उपनगरातील लाखो रहिवाशांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने या प्रकरणी दोन मुख्य मुद्दे उपस्थित केले आहेत. यामध्ये रात्री १ ते सकाळी ६ या वेळेत येणारी दुर्गंधी आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाच्या अभ्यासात नमूद केलेले मिथेन वायूचे उत्सर्जन यावर तातडीने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. कन्नमवार को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी असोसिएशनने दाखल केलेल्या याचिकेची दखल घेत न्यायमूर्तींनी २५ एप्रिलला प्रत्यक्ष डम्पिंग ग्राऊंडला भेट दिली होती. केवळ कन्नमवारनगरच नव्हे, तर मुलुंड, विक्रोळी आणि भांडुप या दाट लोकवस्तीच्या भागांनाही या प्रदूषणाचा फटका बसत असल्याचे खंडपीठाने निरीक्षण नोंदवले. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ मे रोजी होणार आहे.
डिस्प्ले बोर्ड एका महिन्याच्या आत लावा
मिथेन वायू गंधहीन असल्याने तो अधिक धोकादायक असून नागरिकांच्या आरोग्यासाठी तो घातक आहे. रात्रीच्या वेळीच दुर्गंधी का येते, याचा अभ्यास करण्यासाठी रात्री १ ते ६ या वेळेत दररोज प्रदूषण पातळीचे निरीक्षण करून त्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सल्ल्याने डम्पिंग ग्राऊंडवर विविध वायूंच्या पातळीची माहिती देणारा डिस्प्ले बोर्ड एका महिन्याच्या आत लावण्याचे निर्देश दिले.
...तर सार्वजनिक आरोग्यासाठी धोका
पालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे न्यायालयाला सावध केले आहे की, मुंबईतील ९० टक्के घनकचऱ्यावर कांजूरमार्ग येथे प्रक्रिया केली जाते. हा प्रकल्प बंद केल्यास शहरात कचरा उचलणे अशक्य होईल आणि सार्वजनिक आरोग्याची मोठी आपत्ती ओढवेल.
मुदतपूर्व करार संपवल्यास मोठे आर्थिक नुकसान
पर्यायी जागा विकसित करण्यासाठी ७ ते ८ वर्षे लागतील, असेही पालिकेने स्पष्ट केले. कांजूरमार्ग येथील प्रकल्पाचा करार २०३६ पर्यंत असून तो मुदतपूर्व संपवल्यास मोठे आर्थिक दायित्व निर्माण होऊ शकते. सध्या बायो-एंझाइम फवारणी वाढवणे, मिस्टिंग सिस्टीमचा विस्तार आणि मोबाईल ओडर मॉनिटरिंग यांसारख्या अल्पकालीन उपाययोजना समितीने सुचवल्या आहेत.