मुंबई

नाव, निशाणीसाठी दोन्ही गटांमध्ये घमासान सुरु; ठाकरे गटाकडून आयोगाला तीन नावे, तीन चिन्हे सादर

निवडणूक आयोगाकडे आपण त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य यापैकी एक चिन्ह मागितले आहे

प्रतिनिधी

उलट्या काळजाच्या ४० डोक्‍यांच्या रावणाने शिवसेना रूपी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. ज्‍या धनुष्‍यबाणाची बाळासाहेब देव्हाऱ्यात पूजा करायचे, तो धनुष्‍यबाण यांनी गोठविला आहे. आता त्‍यांना आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. त्‍यापेक्षा जास्‍त आनंद त्‍यांच्या पाठिशी असणाऱ्या महाशक्‍तीला झाला असेल; मात्र असे असले तरी मी डगमगलेलो नाही. तुम्‍हीही डगमगू नका. निवडणूक आयोगाकडे आपण त्रिशूळ, धगधगती मशाल आणि उगवता सूर्य यापैकी एक चिन्ह मागितले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उदधव बाळासाहेब ठाकरे अशी पक्षासाठी तीन नवीन नावेही आपण आयोगाल दिली आहेत.

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर आता दोन्ही गटांमध्ये नाव आणि चिन्हासाठी घमासान सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे तीन नावे आणि तीन चिन्हे दिल्यानंतर शिंदे गटानेही ठाकरे गटाने दिलेल्या नावांपैकीच दोन नावे आयोगाकडे मंजुरीसाठी पाठवली आहेत. त्यामुळे आता नवा वाद उद्धवण्याची शक्यता आहे. दोन्ही गटांची दोन नावे सारखीच असल्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे गटाकडून पक्षासाठी ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’ आणि ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ ही तीन नावे देण्यात आली आहेत. तर एकनाथ शिंदे गटाकडून ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे’, या दोन नावांचे प्रस्ताव निवडणूक आयोगाला दिले आहेत. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय दिले आहेत. शिंदे गटाकडून चिन्हाबाबत कोणते पर्याय देण्यात आले आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.त्‍यापैकी आयोगाने एक चिन्ह व नाव आपल्याला द्यावे, असे उद्धव ठाकरे म्‍हणाले. मिंधे गटाचा वापर करून भाजप एक दिवशी फेकून देणार असल्‍याचेही ते म्‍हणाले.निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्‍यबाण आणि पक्षाचे शिवसेना हे नाव अंतरिम निकाल देउन गोठविले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक तोंडावर असतानाच हा निर्णय आल्‍याने ठाकरे गटासमोरील आव्हाने वाढली आहेत. या पार्श्वभूमीवर उदधव ठाकरे यांनी सोशल मीडिया लाईव्ह करून शिवसैनिकांशी संवाद साधला.

काँग्रेसनेही शिवसेनेवर बंदी घातली नव्हती

मी काँग्रेससोबत गेलो म्‍हणून टीका करतात; पण आणीबाणीच्या काळात तत्‍कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही शिवसेनेवर बंदी घातली नव्हती. शिवसैनिकांना त्रास झाला; पण बंदी आली नव्हती. आता तर यांनी बंदी घातली. मग हिंदुत्‍वाच्या विरोधात कोण गेले, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

भाजप शिंदे गटाला वापरून फेकून देईल

यांना शिवसेना संपवायची आहे. भाजपा मिंधेगटाचा त्‍यासाठीच वापर करत आहे. त्‍यांना मात्र ते समजत नाही. आता चिन्ह गोठले. नावही वापरता येणार नाही. एका दृष्‍टीने भाजपाचा हेतू सफल झाला आहे. मिंधे गटाचा उपयोग आता जवळपास संपत आल्‍याचेही उदधव ठाकरे म्‍हणाले.

निवडणूक आयोगाने जो अंतरिम निकाल दिला, तो अपेक्षित नव्हता, असे सांगून उद्धव ठाकरे म्‍हणाले, ‘‘मुळात सगळ्यात पहिल्‍यांदा आम्‍ही १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत याचिका दाखल केली आहे. सगळ्या घटनातज्ज्ञांचे मत आहे, की निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. मग निवडणूक आयोगाने आता जो निकाल दिला, त्‍याची जबाबदारी कोणावर येणार; पण आमचा न्यायदेवतेवर विश्वास आहे. निवडणूक आयोगावर कधी काळी टी.एन.शेषन सारख्या निष्‍पक्ष आणि निस्‍पृह अधिकाऱ्यांनी काम केले आहे. आम्‍हालाही तशाच कामाची अपेक्षा असल्‍याचेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

रावणाने आईच्या काळजात कट्यार घुसवली

माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंनी शिवसेना हे नाव दिले. वडील बाळासाहेबांनी शिवसेना रूजवली. तीच मी आज तुमच्या साथीने पुढे घेऊन जात आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्‍कासाठी हा पक्ष, ही संघटना काढली. हिंदुत्‍वाचा विचार आपण पुढे नेला. हातात काहीही नसताना माणसे येत गेली. अनेकांनी पक्षासाठी विविध त्‍याग केले आहेत. धनुष्‍यबाण हे चिन्ह तर बाळासाहेब देव्हाऱ्यात ठेवून पूजायचे; मात्र या ४० तोंडाच्या उलट्या काळजाच्या रावणाने शिवसेना रूपी आईच्या काळजात कट्यार घुसवली आहे. संकटे येतच असतात; पण संकटात नेहमी एक संधी दडलेली असते. ती संधी मी शोधणार आहे, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री