मुंबई : वडाळा पूर्व येथील महर्षी कर्वे उद्यानातील पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनाप्रकरणी कंत्राटदारावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या चौकशीनंतर मृत मुलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
वडाळा पूर्व स्थानक डेव्हिड ब्रिटो मार्ग येथील महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली होती. वडाळा पूर्व येथे राहणारे अंकुश वागरे (४) व अर्जुन वागरे (५) हे दोघे चिमुकले रविवार, १७ मार्चपासून बेपत्ता होते. त्यामुळे याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात रात्री ९ वाजता ही मुले हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळी स्थानिकांनी शोध घेतला असता, पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील टाकीत ही दोन मुले पडल्याचे आढळले. या मुलांना पालिकेच्या शीव रुग्णायलयात दाखल केले असता, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.