मुंबई : मध्य रेल्वेच्या सुमारे पाच लाख चौरस मीटर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. या जागांवर सुमारे १६ हजारांहून अधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामे उभी राहिली आहेत. काही ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू झाली असून या झोपड्यांवर लवकरच बुलडोझर चालणार आहे.
वांद्रे पूर्वेकडील अनधिकृत झोपड्यांवर पश्चिम रेल्वेने कारवाई केली. या कारवाईनंतर मध्य रेल्वेनेही आपल्या मालकीच्या जागांवरील अनधिकृत झोपड्यांवर कारवाई करण्याचे नियोजन सुरू केले आहे. रेल्वे रुळालगत अतिक्रमण झाल्याने प्रकल्प राबविण्यात अडचणी येत आहेत. यातूनच प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी आता मध्य रेल्वेनेही विशेष मोहीम आखली आहे. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ), स्थानिक प्रशासन आणि पोलिसांच्या मदतीने ही कारवाई टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. संवेदनशील आणि गर्दीच्या भागांमध्ये अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
या कारवाईसाठी अनेक ठिकाणी नोटिसा बजावण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. तसेच काही भागांत प्रत्यक्ष तोडक कारवाईलाही सुरुवात होणार आहे. यामध्ये मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्ट्या, रेल्वे आरक्षित भूखंड आणि स्थानक परिसरातील अतिक्रमणांचा समावेश आहे.
कुर्ला-ट्रॉम्बे भागात ५०,३५५ चौरस मीटर जमिनीवर अतिक्रमणे झाली असून या भागात ५,५९५ झोपड्या, घरे आहेत. घाटकोपर आणि विक्रोळी येथील २४,६५० चौरस मीटर जमिनीवर ४१३ घरे आहेत. भायखळा येथे २१,६०० चौरस मीटर जमिनीवर अतिक्रमण झाले असून या जमिनीवर ८०० अनधिकृत घरे आहेत. ऐरोली येथील ३१,३५५ चौरस मीटर जमिनीवर ७९५ घरे, कसारा येथील ७,३०२ चौरस मीटर जमिनीवर ५५९ घरे, ठाणे येथील ३,२८५ चौरस मीटर जमिनीवर ३६५ घरे बांधण्यात आली आहेत.
कल्याणमध्ये सर्वाधिक अतिक्रमण
कल्याणमधील सुमारे २ लाख ३५ हजार ९०० चौरस मीटर जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. येथे सुमारे ३,१६० घरे व इतर बांधकामे झाली आहेत.
डोंबिवलीमध्येही अतिक्रमण
डोंबिवलीमध्ये जवळपास १ लाख चौरस मीटर क्षेत्रावर अतिक्रमण झाले आहे. या भागात सुमारे २ हजार ९०२ घरे आहेत.