गेल्या काही दिवसांपासून हुलकावणी देणाऱ्या पावसासाठी मुंबईकरांना आणखी आठवडाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
पालघर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, सोलापूर येथे दोन दिवसांत मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याच्या अधिकारी सुषमा नायर यांनी व्यक्त केला आहे. बुधवारी व गुरुवारी संपूर्ण राज्यात मुंबई व कोकण वगळता ‘यलो’ ॲलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे व कोल्हापूर येथे शुक्रवार व शनिवारी ‘यलो’ ॲलर्ट देण्यात आला आहे. मुंबईत शनिवारपर्यंत ‘ग्रीन ॲलर्ट’ देण्यात आला आहे. ८ ऑगस्टनंतर मुंबईत पावसाची शक्यता आहे.
देशात केरळ व तामिळनाडूत मोठी पर्जनवृष्टी होण्याची शक्यता आहे. सरकारने सर्व आपत्कालीन व्यवस्थापन संस्थांना दक्षतेचे आदेश दिले आहेत. सांताक्रूझ येथे मंगळवारी किमान २५.२ अंश व कमाल ३१.७ अंश तापमान नोंदवले गेले, तर हवेतील आर्द्रता ८२ टक्के आहे. तर कुलाबा येथे किमान २७.४ अंश, कमाल ३१.८ अंश, तर हवेतील आर्द्रता ७८ टक्के नोंदवली गेली आहे.