मुंबई : अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात वांद्रे पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. सैफ अली खानवरील हल्ला हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.
१६ जानेवारी रोजी अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात घुसून हल्लेखोराने सैफवर चाकूने वार केले. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी बांगलादेशी नागरिक असलेल्या मोहम्मद शरीफुल इस्लाम याला १९ जानेवारी रोजी ठाण्यातून अटक केली. हल्ल्यादरम्यान सैफच्या मणक्याजवळ अडकलेला चाकूचा तुकडा आणि गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेला एक भाग आरोपीकडून जप्त केलेल्या शस्त्राशी जुळत असल्याचे पोलिसांनी गेल्या आठवड्यात येथील न्यायालयात सांगितले.