मुंबई

मुंबईच्या सोयीसुविधांची हैदराबादला भुरळ; राणी बागेसह विविध प्रकल्पांची घेतली माहिती

प्रतिनिधी

मायानगरी मुंबईत आलेली व्यक्ती मुंबई आपली असे हक्काने सांगते. मुंबईकरांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा, मुंबईचे सौंदर्यीकरण हे प्रत्येकाचे आकर्षण ठरते. मुंबई भेटीवर आलेल्या हैदराबादच्या शिष्टमंडळाला मुंबई महापालिकेने राबवलेली विविध कामे व पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राणी बागेतील सोयीसुविधांची भुरळ पडली आहे. हैदराबादचे शिष्टमंडळ २५ व २६ एप्रिल या दोन दिवसीय दौऱ्यावर आले असता, पालिकेच्या कामांचे कौतुक केले.

या शिष्टमंडळात हैदराबाद महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त व्ही. ममता, उपआयुक्त व्ही. प्रशांती, पी. श्रीनिवास राव, अधीक्षक एस. सी. श्रीवास्तव आणि अधीक्षक हरीबाबू यांचा समावेश होता. या भेटीदरम्यान पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यानंतर संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध विभागवार रचना, परिमंडळ रचना, उपनगरांची रचना, नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा यासह महानगरपालिकेच्या कामकाजाबाबत माहिती देण्यात आली.

घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत संकलित केला जाणारा कचरा आणि त्यावर केली जाणारी प्रक्रिया, नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत करण्यात येणारी जनजागृती यांची संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून कार्यकारी अभियंता नितीन परब यांनी माहिती दिली. यावेळी प्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन) प्रशांत तायशेटे उपस्थित होते, तर आपत्ती व्यवस्थापन विभागाला शिष्टमंडळाने भेट दिली. संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर यांनी आपत्कालिन व्यवस्थापन विभागाचे कामकाज, नियंत्रण कक्ष, सुरक्षेबाबत नागरिकांना दिले जाणारे प्रशिक्षण, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली.

प्रमुख अधिकारी (आपत्ती व्यवस्थापन) रश्मी लोखंडे यावेळी उपस्थित होत्या. तसेच एच पश्चिम विभाग कार्यालयाला शिष्टमंडळाने भेट दिली. सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी शिष्टमंडळाला विभागाच्या कामकाजासह घनकचरा व्यवस्थापनाबाबत माहिती दिली. विभागातील वीज बिल भरणा पद्धत, पाणी बिल भरणा पद्धत यासह कररचना पद्धतीची माहिती शिष्टमंडळाने उत्सुकतेने जाणून घेतली.

शिष्टमंडळाकडून विशेष कौतुक

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला शिष्टमंडळाने बुधवारी भेट दिली. उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. त्यांनी शिष्टमंडळाला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयासंदर्भात सविस्तर माहिती दिली. उद्यानातील विविध सोयीसुविधा, प्राणिसंग्रहालय, स्मार्ट गांडूळ खत सिस्टीम व सेंद्रीय शेती प्रकल्पालाही भेट दिली. उद्यानाची देखभाल व उद्यानाला भेटी देण्यासाठी आलेल्या नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधांसह इतर गोष्टींचे शिष्टमंडळाने विशेष कौतुक केले.

माझ्याकडे दोनच पर्याय, तुरुंग किंवा पक्ष बदलणे! शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ

आणखी एक आमदार शरद पवार गटात? अजित पवार यांना धक्का; झिरवळ यांची मविआच्या बैठकीत हजेरी

कोस्टल रोडच्या बोगद्यात आता बिनधास्त बोला! इंटरनेट सेवा लवकरच कार्यान्वित

उद्धव सेनेचे भाजपला आव्हान; जळगावात भ्रमाचा भोपळा फुटणार?

नव्या प्रशिक्षकाचा शोध घेण्यास प्रारंभ: टी-२० विश्वचषकापूर्वीच मागवणार अर्ज; द्रविडला पुन्हा दावेदारी पेश करण्याची मुभा