मुंबई

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या नागरिकांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मुंबई, नवी मुंबई दिवशीच तसेच ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली.

Swapnil S

मुंबई : सर्वत्र दिवाळीचा सण उत्साहात साजरा होत असताना ऐन लक्ष्मीपूजनाच्या नागरिकांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. मुंबई, नवी मुंबई दिवशीच तसेच ठाणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसाने सर्वांची तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, घराबाहेर लागलेले कंदील, रांगोळ्या पावसाच्या पाण्यात भिजल्या. त्याचबरोबर दिवाळीतील सर्वांचे आकर्षण असलेले गडकिल्ले या पावसात भिजल्याने ते बनवणाऱ्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पसरली.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे ढग जमा झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी अचानक विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचबरोबर वाराही वेगाने वाहत होता. सध्या दिवाळीची धामधूम सुरू असल्याने गेल्या काही दिवसांपासून दिवसभर बाजारपेठा गर्दीने फुललेल्या असतात.

रस्त्यांवर वाहनाची मोठी गर्दी असते. आजही लक्ष्मीपूजनासाठी पूजासाहित्य व इतर खरेदी करण्यासाठी लोक घराबाहेर पडले असल्याने अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वांची त्रेधातिरपीट उडाली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना पावसापासून बचाव करण्यासाठी तर विक्रेत्यांना रांगोळी, पणत्या, हार, फुले, तोरणे व इतर साहित्य भिजण्यापासून वाचवण्यासाठी धावाधाव करावी लागली.

फटाके भिजल्याने फटाके विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे त्यांच्या दिवाळीच्या उत्साहावर पाणी पडले. सुमारे दीड तासानंतर म्हणजे पावणे सातच्या सुमारास पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, बदलापुरात सुमारे तासाभरात १०१.८ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबई उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले येथे जोरदार पावसाची नोंद झाली.

दरम्यान, गेल्या आठवड्यापासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली असून त्यात आता दिवाळीच्या फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आणखी भर पडली आहे. मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे पलीकडे गेला आहे.

पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

देशभरातून मान्सूनने माघार घेतली असली तरी आता पुन्हा एकदा राज्यावर पावसाचे संकट घोंघावत आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान खात्याने राज्यभरात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बुधवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि बुलढाणा या भागात जोरदार पाऊस पडू शकतो. गुरुवारी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथे हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.

दिवाळीच्या सणात पावसाची आतषबाजी; शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

राज ठाकरेंच्या दीपोत्सवावर सरकारची जाहिरातबाजी; मनसेची संतप्त पोस्ट, म्हणाले, "आमच्या पक्षाला...

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास

वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन