मुंबई : दिवाळीत मिळणारा बोनस हा कामगारांचा हक्काचा असतो. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा आचारसंहिता लागू होण्याआधी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला. २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दिवाळी सण होता. मात्र दिवाळी संपून महिना उलटल्यानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात २९ हजार रुपये बोनस (सानुग्रह अनुदान) जमा झाल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
यंदा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी राज्यात आचारसंहिता लागू झाली. त्यावेळी कुठलीही नवीन घोषणा करण्यास मनाई आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या काही वेळ आधी पालिका कर्मचाऱ्यांना २९ हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आला. मात्र दिवाळी संपली तरीही तो त्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता. अखेर गुरुवारी बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत.
मुंबईकरांची तिसरी लाइफलाइन म्हणून बेस्टकडे पाहिले जाते. कर्मचाऱ्यांमुळे बेस्टची सेवा मुंबईकरांसाठी सुरू असते. वेळेत बोनस मिळावा अशी अपेक्षा बेस्टच्या कर्मचाऱ्यांची होती. मात्र उशिरा का होईना त्यांच्या खात्यात बोनसची रक्कम जमा झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पालिका प्रशासनाकडून बेस्टला ८० कोटी
पालिका प्रशासनाने ८० कोटी रुपयांची रक्कम बेस्टच्या बँक खात्यात ऑनलाइन जमा केली होती. पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे बेस्ट कामगार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वाटप करता आले नव्हते. अखेर आचारसंहिता संपताच कर्मचाऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. गुरुवारी अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यात आयकर न कापता प्रत्येकी २९ हजार रुपये बोनसची रक्कम जमा करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. उशिरा का होईना बोनसची रक्कम जमा झाल्याने कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.