मुंबई

दारुच्या नशेत पोलिसाला मारहाण; दोघांना अटक

यावेळी या दोघांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडून धमकी देण्याचा प्रयत्न केला होता

नवशक्ती Web Desk

मुंबई : गणवेशात असलेल्या एका पोलीस शिपायाशी हुज्जत घालून मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन मद्यपी तरुणांना कुरार पोलिसांनी अटक केली. अनिल भिमराव हिवाळे आणि शेखर अंबादास बनसोडे अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

संतोष ज्ञानोबा सुरनर हे गोरेगाव येथे राहत असून,सध्या कुरार पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत. गुरुवारी ते रात्रपाळीवर कामावर रुजू झाल्यानंतर त्यांच्यावर बीट मार्शल म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली होती. परिसरात गस्त घालत असताना त्यांना मालाडच्या कुरारगाव, लक्ष्मणनगर परिसरात काहीजण दारुच्या नशेत रस्त्यावर गोंधळ घालत असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ते तिथे रवाना झाले होते. तिथे त्यांना रेखा सावंत या महिलेने काहीजण दारुच्या नशेत धिंगाणा घालत असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांनी धिंगाणा घालणाऱ्या अनिल आणि शेखर यांना घरी जाण्याचा सल्ला दिला.

यावेळी या दोघांनी त्यांच्याशी हुज्जत घालून त्यांची कॉलर पकडून धमकी देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी एकाने त्यांच्या नाकावर जोरात ठोसा मारला होता. त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होऊ लागला. या घटनेनंतर तिथे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्यांना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली होती. अटकेनंतर या दोघांनाही गुरुवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या