मुंबई

निवडणुकीत राणेंचो भ्रष्टाकार, कारवाई करूक होयी! निवडणूक आयोगाला ठाकरे सेनेची नोटीस

Swapnil S

मुंबई : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण तातू राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्ष निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी याबाबतची कायदेशीर नोटीस ठाकरे सेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला ॲड. असीम सरोदे, ॲड. किशोर वरक, ॲड. श्रीया आवले यांच्या मार्फत पाठवलेली आहे.

निवडणूक प्रचार कालावधी ५ मे २०२४ रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते ६ मे २०२४ रोजी सुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.

“जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडे निधी मागायला यायचे आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही’’ अशी धमकी १३ एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली. त्याचाही उल्लेख नोटिस मध्ये करण्यात आलेला आहे.

निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिशीद्वारे केलेली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने ०७ दिवसात या नोटिशीला उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे ॲड. असीम सरोदे म्हणाले.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?