मुंबई

एलफिन्स्टन पुलाच्या पाडकामासाठी चार मेगाब्लॉक; रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू

ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन रोड रेल्वे पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्याचे पाडकाम आता वेगाने केले जाणार आहे. या पुलाचा रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने चार मेगाब्लॉक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सवानंतर ब्रिटिशकालीन एलफिन्स्टन रोड रेल्वे पूल बंद करण्यात आल्यानंतर नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच हा रेल्वे पूल लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी त्याचे पाडकाम आता वेगाने केले जाणार आहे. या पुलाचा रेल्वे रुळांवरून जाणारा भाग हटवण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने चार मेगाब्लॉक घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या ब्रिटिशकालीन पुलासाठी वापरलेली लोखंडी तुळई, पोलादी सांगाडा आणि काँक्रीटचा भाग हटवण्यासाठी मोठ्या क्रेन, गॅस कटिंग मशीन यांसारख्या यंत्रणांचा वापर होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या ट्रॅकवरून जाणाऱ्या ट्रेनना पूर्णपणे थांबवणे गरजेचे आहे. या ठिकाणी सुरक्षेसाठी तांत्रिक कर्मचारी तैनात राहणार आहेत. तरीही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा मेगाब्लॉक घेणे अत्यावश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी मेगाब्लॉक रात्रकालीन अथवा रविवारी घेण्यात येणार आहेत. यामुळे नियमित प्रवासात अडथळा कमी होईल. त्याचबरोबर, गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या नवीन पुलाचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने प्रवाशांना केले आहे.

एलफिन्स्टन पुलाचे पाडकाम सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे. प्रवाशांची गैरसोय कमी करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून केला जाणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी सांगितले.

मेगाब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द होतील, काहींचे मार्ग बदलले जातील, तर काही गाड्या ठरावीक स्थानकांवरच थांबवल्या जातील. जलद व धीम्या दोन्ही मार्गांवर याचा परिणाम होणार आहे. प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत घोषणा, ॲॅप्स आणि सोशल मीडियावरील अपडेट लक्षात घ्यावेत. तसेच पर्यायी मार्गांचा वापर करणे सोयीचे ठरेल.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री आणि सोमवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाचा तसेच एलफिन्स्टन पूल बंद असल्याचा चांगलाच फटका नागरिकांना बसला. टिळक पूल, हिंदमाता, परेल, करी रोड आणि वरळीतील लोटस जेट्टी येथे वाहतूककोंडी झाली होती.

६० दिवसांत पूल पाडणार

एलफिन्स्टन पूल ६० दिवसांत पाडण्यात येणार आहे. दसरा-दिवाळीत प्रवासी गर्दीचा विचार करून रेल्वेमार्गांवरील ब्लॉक सणानंतर घ्यायचा की नवरात्रीदरम्यानच सुरू करायचा, याबाबत रेल्वे प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. पूल पूर्णपणे पाडण्यासाठी किमान तीन ते चार मोठे मेगाब्लॉक घ्यावे लागणार आहेत. त्यापैकी प्रत्येक ब्लॉक साधारण चार ते सहा तासांचा असेल. रात्री उशिरा काही छोटे रात्रीकालीन ब्लॉकही घेण्यात येतील.

मतदारच डिलीट केले! राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर आरोप

मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; आठवड्याभरात दुसरी घटना, पोलिसांकडून अलर्ट जारी

मालेगाव बॉम्बस्फोटातील निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस

मराठा समाजाला मोठा दिलासा! हैदराबाद गॅझेटविरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली

...म्हणून मला मोदींना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही! पंच्याहत्तरीनंतरही सक्रिय असलेल्या शरद पवारांचे वक्तव्य