मुंबई

गणेशोत्सव मंडपात पोलिसांना पाहून पळापळ ;पत्ते खेळणाऱ्या तरुणाचा मृत्यू

हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने प्रचितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले

नवशक्ती Web Desk

विरार : आगाशी गावातील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपात पत्ते खेळत असताना पोलिसांना पाहून पळणाऱ्या तरुणाचा पडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. पोलिसांचे गस्ती वाहन पाहून मंडपातील तरुणांची एकच पळापळ झाली. यावेळी प्रचित भोईर हा १९ वर्षांचा तरुण अचानक खाली कोसळून बेशुद्ध पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

आगाशी गावात गणेशोत्सव मंडपात रात्रीच्या वेळी तरुणांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्नाळा सागरी पोलिसांचे गस्ती वाहन तिथे आले. पोलिसांची अचानक धाड पडल्याने तरुणांची एकच पळापळ झाली. प्रचित भोईर हा १९ वर्षांचा तरुण पोलिसांना घाबरून पळून जात असताना अचानक खाली कोसळला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने प्रचितचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे आगाशी गावात शोककळा पसरली असून पोलिसांविरोधात रोष निर्माण झाला आहे. तरुणाच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. रात्रीच्या वेळी गणपती मंडळातील मुले जागरण करत असल्यामुळे पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. त्या तरुणाला पोलिसांनी वेळीच प्रथमोपचार दिले असते तर त्याचा जीव वाचला असता, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव करपे यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी गणपती मंडपावर छापा घातला नाही. पोलिसांचे गस्तीचे वाहन तेथून जात असताना पोलीस आपल्याला पकडतील या भीतीने त्या तरुणांची पळापळ झाली, त्यात सदर तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, असे ते म्हणाले.

“यापुढे एकनाथ शिंदेंवर टीका झाली, तर..." ; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजनांचा ठाकरे बंधूंना इशारा

बांगलादेशातील हिंसाचारावर भारत आक्रमक; परराष्ट्र मंत्रालयाकडून कारवाईची मागणी, "अल्पसंख्याकांच्या विरोधातील शत्रुत्व...

पुण्याच्या राजकारणात मोठी घडामोड! प्रशांत जगताप यांनी धरला काँग्रेसचा 'हात', पक्षाची ताकद वाढणार?

अवघ्या १० वर्षांच्या श्रवण सिंगला राष्ट्रपतींच्या हस्ते 'प्रधानमंत्री बाल पुरस्कार'; म्हणाला, "मला स्वप्नातदेखील...

"रुग्णालयानेच त्याला मारले": कॅनडामधील भारतीय व्यक्तीच्या पत्नीने सांगितला ८ तासांचा भयावह अनुभव