मुंबई : राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांतील ‘गोशाळा’ किंवा गोवंश आश्रयस्थाने गिधाडांसाठी विषारी ठरणारी पशुवैद्यकीय औषधे वापरणे थांबवत असल्याने संकटग्रस्त गिधाडांच्या लोकसंख्येला स्थैर्य मिळण्यास मदत होत असल्याचे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ने (बीएनएचएस) म्हटले आहे.
‘बीएनएचएस’नुसार, ‘जटायू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाँग-बिल्ड गिधाडांची संख्या सुमारे ९९ टक्क्यांनी घटली होती. यामागे प्रामुख्याने जनावरांना दिली जाणारी काही नॉन-स्टिरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी औषधे कारणीभूत होती. उपचार केलेल्या जनावरांच्या मृतदेहांवर गिधाडांनी ताव मारल्यास या औषधांचे अवशेष त्यांच्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवतात आणि त्यामुळे मृत्यू होतो.
अनेक गोशाळांनी डायक्लोफेनॅक, एसेक्लोफेनॅक, केटोप्रोफेन आणि निमेसुलाइड यांसारखी विषारी औषधे वापरणे बंद करून मेलॉक्सिकॅम आणि टोल्फेनॅमिक अॅसिडसारख्या सुरक्षित पर्यायांकडे वळण घेतले आहे, असे ‘बीएनएचएस’ने सांगितले. काही गोवंश आश्रयस्थानांनी मृत जनावरे पुरण्याची प्रथाही बंद करून, गिधाडांना खाद्य मिळावे यासाठी ठरावीक ठिकाणी मृतदेह ठेवण्यास सुरुवात केली आहे, असे या वन्यजीव संशोधन व संवर्धन संस्थेने नमूद केले.
‘बीएनएचएस’चे उपसंचालक डॉ. सुजित नरवडे यांनी सांगितले की, बिकानेरजवळील जोर्बीर संवर्धन राखीव क्षेत्रासारखी ठिकाणे गौशाळांनी अवलंबलेल्या निसर्गपूरक मृतदेह विल्हेवाट पद्धतींमुळे निवासी आणि स्थलांतरित गिधाडांसाठी महत्त्वाची अधिवासस्थाने म्हणून पुढे आली आहेत. ‘बीएनएचएस’ गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील गिधाड लोकसंख्येवर देखरेख करत आहे, असेही त्यांनी नमूद केले. मध्य प्रदेशातही, भोपाळजवळील रामकली गोशाळेसह अशाच पद्धती आढळून आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
गिधाडांसाठी अन्न
या उपाययोजनांमुळे गिधाडांच्या संख्येतील घट रोखण्यास मदत झाली असून काही भागांत हळूहळू पुनरुज्जीवन दिसून येत आहे, असे ‘बीएनएचएस’चे संचालक किशोर रिठे यांनी सांगितले. गौशाळा मोठ्या प्रमाणावर गोवंशाचे व्यवस्थापन करत असल्याने गिधाड संवर्धनात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. “विषारी पशुवैद्यकीय औषधांचा त्याग करून आणि पारंपरिक मृतदेह विल्हेवाट पद्धती अवलंबून गौशाळा गिधाडांसाठी सुरक्षित अन्न उपलब्ध करून देत आहेत. तसेच रोगांचा प्रसार कमी करून सार्वजनिक आरोग्यालाही हातभार लावत आहेत, असे रिठे म्हणाले.