कलाकार आणि कलारसिकांसाठी इंडिया आर्ट फेस्टिव्हल कायम एक पर्वणी ठरले आहे. यंदा या फेस्टिव्हलचे दशकपूर्ती पर्व साजरे करण्यात येत आहे. कोरोना प्रादुर्भावानंतर प्रथमच वरळीतील नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत २६ ते २९ मे सकाळी ११ ते सायंकाळी ७:३० दरम्यान या भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
स्थानिक व जागतिक पातळीवरील ५५० कलाकार आणि ४५ कलादालनांकडून ४५०० कलाकृतींचे सादरीकरण यावेळी करण्यात येणार आहे. निसर्ग चित्रे, व्यक्तिचित्रे, आध्यात्मिक कलाकृती, वारली कला, शिल्पकृती आणि कलांची मेजवानी या प्रदर्शनातून कलारसिकांना अनुभवता येणार आहे.
इंडिया आर्ट फेस्टिव्हलद्वारे वेगवेगळ्या चित्र प्रकारातून, संकल्पनेतून रसिकांना सामाजिक, पर्यावरणपूरक तसेच बौद्धिक संदेश पोहोचवण्यात येतो. यंदा हे फेस्टिव्हल आपल्या १० वर्षांच्या प्रवासाचा अनोखा सोहळा साजरा करणार आहे. वरळीतील नेहरू आर्ट गॅलरीत पार पडणाऱ्या या भव्य प्रदर्शन सोहळ्यामध्ये ४० शहरांमधील २५० स्वतंत्र कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत. या महोत्सवात गॅलरी स्प्लाश, क्युरेटरस आर्ट, लेक्सिकॉन आर्ट गॅलरी, ग्रेस्केल, स्टुडियो तीन आणि ऱ्हिदम आर्ट या कलादालनांचे सादरीकरण आहे. तर नामवंत चित्रकार मनु पारेख, लालुप्रसाद शॉ, परेश मैती, सतीश गुप्ता, सीमा कोहली, गुरुदास कामत, बी प्रभा, जतीन दास, जोगेन चौधरी व जवळपास १०० प्रख्यात चित्र-शिल्पकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे.
ही चित्रे प्रमुख आकर्षणाची
या प्रदर्शनात तैलचित्रे, अॅक्रिलिकमधील चित्रे, जलरंगातील चित्रे इत्यादी पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे शिल्पे आणि ओरिजिनल प्रिंट्स, निसर्गचित्रे, फिगरेटिव्ह्ज, अॅबस्ट्रॅक्ट चित्रे या शोमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळणार आहेत. यासोबत शहरातील दृश्ये, समुद्राचे रंग, शहरी व ग्रामीण प्रसंग, व्यक्तिचित्रे, न्यूड्स, धार्मिक कला, म्युरल्स, पारंपरिक चित्रे, पिचवाई कला, वारली कलाकृतीसुद्धा रसिकांना अनुभवता येणार आहे.