अतिसार होऊन पाच वर्षांपर्यंतची बालके दगावण्याचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दीष्ट मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ठेवले आहे. ‘राष्ट्रीय अतिसार नियंत्रण कार्यक्रम’ अंतर्गत १ ते १५ जुलै या पंधरवड्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कालावधीत ० ते ५ वर्षाच्या बालकांना ओ. आर. एस. व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे.
या वयोगटातील बालकांना ओ. आर. एस. व झिंकची गोळी देऊन अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. यासाठी गृहभेटीदरम्यान प्रत्येक बालकासाठी एक ओ. आर. एस. पाकीट हे भविष्यात जुलाब, हगवण झाल्यास वापरण्याकरता पालकांना माहितीसह देण्यात येत आहे. तसेच सदर भेटीदरम्यान अतिसार झालेली बालके आढळल्यास त्यांना आवश्यकतेनुसार ओ. आर. एस. व झिंक गोळ्यासुद्धा देण्यात येत आहेत. तसेच या अनुषंगाने बालकांचा आजार कमी न झाल्यास अथवा अतिसाराचे प्रमाण आढळल्यास पालकांनी त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्र अथवा रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. प्रत्येक आरोग्य केंद्र, दवाखाना व महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओ. आर. एस. व झिंक कॉर्नरची स्थापनासुद्धा करण्यात येत आहे.