मुंबई

फडणवीसांचे ज्ञान इतके तोकडे असेल असे वाटले नव्हते -उद्धव ठाकरे

सर्वोच्च न्यायालयात जेव्हा मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर एक वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते

नवशक्ती Web Desk

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ज्ञान इतके तोकडे असेल असे मला वाटले नव्हते. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मंजूर नसेल तर त्याबाबतचा वटहुकूम काढण्याचे अधिकार केवळ संसदेलाच आहे. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात वटहुकूम काढण्याचा अधिकार नाही. देवेंद्र फडणवीस यांना मी अभ्यासू समजत होतो, पण ते तर मंत्रालयाच्या आजूबाजूला देखील फिरण्याच्या कुवतीचे नाहीत, असा टोला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. लाठीमारप्रकरणी एक फुल दोन हाफ म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयात जेव्हा मराठा आरक्षण रद्द झाले त्यानंतर एक वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांनी का वटहुकूम काढला नाही, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीसांचे ज्ञान इतके तोकडे असेल असे मला वाटले नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलायचा असेल तर वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे. फडणवीस हे मंत्रालयाच्या आजूबाजूला फिरकण्याच्या देखील क्षमतेचे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर केंद्र सरकार वटहुकूम काढू शकते. तो कायदा संसदेत होतो. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरविण्याचा अधिकार संसदेला आहे. आता संसदेचे विशेष अधिवेशन घेत आहात ना त्यात निर्णय घ्या. माझी जर चूक झाली असेल असे जर फडणवीसांना वाटत असेल तर त्यांनी तो निर्णय घेऊन दाखवावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

अजितदादांना मी त्यातल्या त्यात समजदार माणूस होतो. मी संघनायक होतो, तर हे विकेटकिपर संघात होते ना, ते काय करत होते मी चुकत होतो तर. आज जी डोकी फोडली त्याचे श्रेय या सगळ्यांनी टीमवर्क म्हणून स्वीकारले पाहिजे. एक फूल, दोन हाफ या सगळ्यांनी राजीनामा दिला पाहिजे. सरकार नजीकच्या काळात कधीच इतक्या निर्घृणपणे वागले नव्हते. न्यायहक्कासाठी कोणी रस्त्यावर आले तर घरात घुसून मारू, हा प्रकार सरकारकडून करण्यात येत आहे. याचा प्रत्यय बारसूमध्येही आला होता. हिंदुत्ववादी मानणारे सरकार वारकऱ्यांवर देखील लाठ्या चालविते. लाठीमारावर आदेश कोणी दिला. मी जातीने कधी बघत नाही, पण फडणवीस वेगळे काढले तर एक फूल, एक हाफ काय करत आहेत. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश