मुंबईत २९ लाख झाडांची संख्या असून आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणावर झाडांची संख्या आहे. आरे कॉलनी म्हणजे मुंबईचे फुफ्फुस असून आरे वाचले तर मुंबईतील पर्यावरण वाचेल, त्यासाठी आरेतील जंगल झाडे वाचवण्यासाठी आम आदमी पक्षाने उडी घेतली असून आरे कॉलनीत मेट्रो रेलचे कारशेड होऊ देणार नाही, असा इशारा आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती मेनन यांनी दिला आहे. आरेचे अस्तित्वात टिकवण्यासाठी रविवारी आरेतील पिकनिक पाॅईट्स येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टीचे नेते, कार्यकर्ते तसेच पर्यावरण प्रेमी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने यात सहभाग नोंदवला.
मुंबईत मेट्रोसाठी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. मात्र २०१९ मध्ये महाविकास आधाडीचे सरकार आले आणि आरेतील कारशेडचा प्रकल्प रद्द केला आणि कांजूर मार्ग येथे कारशेडसाठी जागा उपलब्ध करून घेतली.
मात्र आता पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता स्थापन झाली असून कारशेड आरे कॉलनीत होणार असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे आरेतील कारशेडचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.