(संग्रहित) 
मुंबई

फक्त 'खिचडी’ की युतीच्या चर्चा? मंत्री उदय सामंत यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

अलीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची आज सकाळी भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चांना उधाण आले.

नेहा जाधव - तांबे

मुंबई : अलीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना शिवसेना (शिंदे गट) नेते उदय सामंत आणि राज ठाकरे यांची आज सकाळी भेट झाली. या भेटीनंतर पुन्हा एकदा मनसे आणि शिंदे गट युतीच्या चर्चांना उधाण आले. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असल्याने ही भेट राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, सामंत आणि मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही चर्चा पूर्णतः अराजकीय असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

राजकीय खिचडी नव्हे, तर फक्त खिचडी खाल्ली -

उदय सामंत म्हणाले, "मी राज ठाकरे यांची फक्त सौजन्य भेट घेतली. आम्ही चहा घेतला, खिचडी खाल्ली आणि काही अराजकीय गप्पा मारल्या. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय खिचडी नव्हे, तर फक्त खिचडी खाल्ली."

राजकारणापलीकडेही नाती असतात -

"राजकारणापलीकडेही नाती असतात. मी या परिसरातून जात होतो म्हणून राजसाहेबांना भेटलो. त्यांनी चहासाठी बोलावलं आणि आम्ही नाश्ता केला. भेटीत राजकीय चर्चा झाली असती तर मी ती जाहीरपणे सांगितली असती," असे सामंत यांनी माध्यमांना सांगितले. "ही माझी राज ठाकरे यांच्यासोबत चौथी भेट आहे. प्रत्येक भेटीला राजकीय अर्थ लावणं चुकीचं आहे. उद्या रस्त्यावर संदीपजी भेटले तरी चर्चा होईल की आम्ही युतीसाठी भेटलो. याला काही अर्थ नाही. काही भेटी अराजकीय असतात हे मान्य करायला हवं," असे ते म्हणाले.

आता मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार -

शेवटी सामंत यांनी मिश्किल टिप्पणी करत सांगितले की, "आता मी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल की मी राज ठाकरेंचा निरोप घेऊन जातोय! जेव्हा मी राजकीय निरोप घेऊन जाईन, तेव्हा मी आणि संदीपजी मोठी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत सविस्तर माहिती देऊ."

दरम्यान, यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान दादर आणि वरळी मतदारसंघात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांमध्ये उमेदवारीच्या बाबतीत विसंवाद दिसून आला होता. विशेषतः वरळी विधानसभेत शिवसेना शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांच्याकडून अमित ठाकरे यांना पराभवाचा धक्का बसला. हि चूक महानगरपालिकेच्या बाबतीत होऊ नये यासाठी ही भेट आहे का? असा सवाल उपस्थित होत होता.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले