मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात पायाभूत सुविधांपैकी महत्त्वाचा असलेल्या कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्प मार्च २०२७ मध्ये पूर्ण होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेतर्फे एका प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली.
मुंबई उपनगरीय रेल्वेच्या जाळ्यात कल्याण हे महत्त्वाचे स्टेशन आहे. सध्या कल्याण रेल्वे स्थानकात रोज ४ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यातून रोज ४५ लाख रुपये महसूल गोळा होतो. मध्य रेल्वेचे हे महत्त्वाचे जंक्शन असून उत्तरेकडे जाणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांचे विभाजन होते. रोज ७५० मेल व एक्स्प्रेस, उपनगरीय रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकातून धावतात. सध्या कल्याण रेल्वे स्थानकात ८ फलाट आहेत. सध्या अनेक लोकल व एक्स्प्रेस या फलाट मिळत नसल्याने कल्याण स्थानकाबाहेर उभ्या असतात. कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाला ८०० कोटी रुपये खर्च येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातील लांब पल्ल्याच्या गाड्या व उपनगरीय रेल्वे लोकल मार्गिकेचे विभाजन होणार आहे. त्यामुळे गाड्यांना विलंब लागतो. कल्याण यार्ड रिमॉडिलिंग काम पूर्ण झाल्यावर लांब पल्ल्याच्या गाड्या व उपनगरीय लोकलच्या मार्गिकांचे विभाजन होऊ शकेल. यामुळे अतिरिक्त फलाट बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उपनगरीय रेल्वे गाड्या वेळेत धावू शकतील. त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या गाड्या व मालगाड्यांची वाहतूक सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकल्पात ५६७०० चौरस मीटरचा मोठा स्लॅब संपूर्ण फलाटांवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे या रेल्वे स्थानकाचे सर्व प्रकारच्या मोसमात संरक्षण होणार आहे. परिणामी गर्दीचे नियंत्रण व्यवस्थित करता येऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. लोकल वाहतुकीचे विभाजन करणे हा त्याचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन व कार्यक्षमता वाढणार आहे. मालगाडीसाठी वेगळे यार्ड बनवण्यात येणार आहे. त्यामुळे मालगाडीची वाहतूक सुरळीत होईल. त्यातून प्रवासी वाहतुकीत होणारे अडथळे कमी होतील, असे हा अधिकारी म्हणाला.