महाराष्ट्राच्या महाउत्सवाचा म्हणजेच गणेशोत्सवाचा आज समारोप होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या भक्ती, उत्साह आणि जल्लोषानंतर लाडक्या गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच पावसाच्या सरींनी हजेरी लावली असली तरी विसर्जन सोहळ्याचा उत्साह अबाधित आहे. विशेषतः लालबाग परिसरात 'लालबागचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ होताच वातावरण भाविकांच्या जयघोषांनी दुमदुमून गेले. अनेक भाविकांना अश्रू अनावर झाले.
आरती व उत्तरपूजनानंतर राजाची पालखी मिरवणुकीला निघाली असून, गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दूरदूरहून आलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. ''ही शान कोणाची? लालबागच्या राजाची'' या सादांनी लालबाग परिसर भारावून गेला आहे. भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू तर ओठांवर जल्लोष दिसत आहे.
लालबागच्या राजाआधी 'मुंबईचा राजा' आणि 'तेजूकाय गणपती' मंडपातून बाहेर पडले असून, त्यांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाची शाही मिरवणूक सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि भक्तिगीतांच्या गजरात गणेश विसर्जन सोहळा रंगत आहे.
शहरात विविध मंडळांच्या तसेच घरगुती मूर्तीही विसर्जनासाठी रवाना झाल्या आहेत. प्रशासनाने वाहतूक व सुरक्षा यासाठी विशेष व्यवस्था केली असून, विसर्जन मार्गांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
गेल्या दहा दिवसांपासून भाविकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या बाप्पांना निरोप देताना प्रत्येकाच्या मनात एकच भावना आहे ''जड अंतःकरणानं निरोप देतो, पण पुढच्या वर्षी नक्की लवकर या बाप्पा!''