मुंबई

राज्यात मलेरियाचे संकट, तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद

कोरोना संसर्गाच्या काळात मागील दोन वर्षांत मलेरियाची रुग्णसंख्या दुप्पट झाली होती.

प्रतिनिधी

राज्यात कोरोना संसर्गाच्या रुग्णांची संख्या नियंत्रणात येत असली तरीही पावसाळी आजारांचा ताप मात्र वाढताच आहे. मलेरियावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे अजूनही शक्य झाले नसून, राज्यामध्ये या तापाच्या तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी गेल्या दोन दिवसांत तब्बल २०० रुग्ण आढळले असून या तापामुळे तीन जणांचा मृत्यूही झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात मागील दोन वर्षांत मलेरियाची रुग्णसंख्या दुप्पट झाली होती. पावसाळा, वाढती लोकसंख्या, पाणी साचण्याची वाढलेली ठिकाणे, स्वच्छतेचा अभाव, योग्य वेळी वैद्यकीय उपचार सुरू न करणे, डासांच्या अळ्या नष्ट न करणे, अशा विविध कारणांमुळे मलेरिया संसर्गाचा प्रादुर्भाव वाढतो. २०१९-२०मध्ये राज्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या ९,४९१ होती. ९ जुलै २०२२ पर्यंत राज्यात मलेरियाच्या ३,३३९ रुग्णांची नोंद झाली असून, डेंग्यूच्या ९०६ रुग्णांची नोंद झाली आहे. या कालावधीमध्ये राज्यात ९८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाली असून, त्यात दोन जणांचा मृत्यू झाला. चिकनगुनियाही वाढता असून या आजाराची लागण ४१३ रुग्णांना झाली आहे. मलेरिया हा आता वर्षभर राहणारा आजार असल्याचे साथरोग आजाराचे तज्ज्ञ डॉ. रोहन पाटील यांनी सांगितले. पावसाळ्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे या ऋतूमध्ये यंत्रणेसह सर्वसामान्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

डासांची उत्पत्तीस्थळे रोखण्यासाठी काळजी घेणे, बांधकामक्षेत्रे, पाणी साठून राहणाऱ्या जागांवर औषधांची फवारणी तसेच अधिक लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये वैद्यकीय तपासण्या करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

BMC Election 2026 : भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेनंतर मुंबईसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी?

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर; एका क्लिकवर वाचा सर्व माहिती

Unnao rape case : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; तुरुंगातच राहणार माजी भाजप आमदार कुलदीप सेंगर; जामिनाला स्थगिती

लग्नाआधीच आनंदावर विरजण; नाशिकमध्ये वधूचा दुर्दैवी अंत, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

कन्फर्म तिकीट मिळण्याची संधी वाढणार! IRCTC ने नियमात आजपासून केला ‘हा’ बदल