मुंबई : एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यात जेसाभाई मोटाभाई माली या हवाला व्यावसायिकाला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्याच्या अटकेने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या आता ११ झाली असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. अटकेनंतर जेसाभाईला रविवारी दुपारी किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात एमडी ड्रग्ज तस्करी करणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी पर्दाफाश केला होता. याच गुन्ह्यात एका महिलेसह दहा जणांना पोलिसांनी मुंबईसह गुजरात आणि सांगली येथून पोलिसांनी अटक केली होती. त्यात परवीनबानो गुलाम शेख, साजिद मोहम्मद आसिफ शेख ऊर्फ डेबस, इजाजअली इमदादअली अन्सारी, आदित्य इम्तियाज बोहरा, प्रविण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे, वासुदेव लक्ष्मण जाधव, प्रसाद बाळासो मोहिते, विकास महादेव मलमे, अविनाश महादेव माळी आणि लक्ष्मण बाळू शिंदे यांचा समावेश होता.
या टोळीचा प्रमुख प्रवीण शिंदे असून त्याने सहा महिन्यांपूर्वी सांगली येथील महाकाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी बनविण्याचा एक कारखाना सुरू केला होता. या कारखान्यांची माहिती प्राप्त होताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तिथे कारवाई करून कोट्यवधी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत २५२ कोटी २८ लाख रुपयांचे १२६ किलो १४१ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज, १५ लाख ८८ हजार रुपयांची कॅश, दिड लाखाचे २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दहा लाख रुपयांची एक स्कोडा कार असा २५२ कोटी ५५ लाख ३८ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त होता.