मुंबई

गोवर, रुबेला हे आजार २०२४ पर्यंत हद्दपार होणार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत २९ ऑगस्‍ट २०२२ पासून घरोघरी जाऊन गणना सर्वेक्षण करण्यात येत आहे

प्रतिनिधी

गोवर, रुबेला हे आजार २०२४ पर्यंत हद्दपार करण्यासाठी मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागाने योग्य ते नियोजन केले आहे. विविध आजारांपासून गर्भवती महिला आणि ० ते २ वर्षे वयाच्या आतील बालकांचे संरक्षण करण्यासाठी त्यांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. लसीकरणापासून ते वंचित राहू नयेत, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत २९ ऑगस्‍ट २०२२ पासून घरोघरी जाऊन गणना सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत १२ लाखांहून अधिक घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून २० सप्‍टेंबर २०२२ पर्यंत ही सर्वेक्षण मोहीम सुरु राहील. सर्वेक्षणातील माहिती आधारे पुढील सहा महिन्यांच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात येणार आहे.

लसीकरण कार्यक्रमात ० ते २ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ, काविळ, क्षयरोग, घटसर्प, धनुर्वात, डांग्‍या खोकला, गोवर, रुबेला, गालगुंड व रोटा व्हायरस-डायरिया, न्यूमोनिया यासारख्‍या आजारांपासून व गर्भवती महिलांचे लसीकरण करुन नवजात बालकांना धनुर्वात आजारापासुन संरक्षित करण्‍यात येते. सदर नियमित लसीकरण व पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेमुळे सन २०१४ पासून भारत पोलिओमुक्‍त झाला आहे. तसेच नवजात बालकांमध्‍ये धनुर्वात आजाराचे निर्मूलन झाले आहे. त्‍याचप्रमाणे, गोवर, रुबेला या आजाराचे सन २०२४ पर्यंत निर्मूलन करण्‍याचे ध्येय ठेवून त्यादिशेने वाटचाल सुरु आहे.

लसीकरण कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणण्‍याच्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी विशेष सर्वेक्षण करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य खात्याला दिले होते. उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुर्हाडे व कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली २९ ऑगस्‍ट पासून घरोघरी जाऊन गणना सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.

२० सप्‍टेंबरपर्यंत हे सर्वेक्षण सुरु राहणार आहे. सहाय्यक प्रसाविका, आरोग्‍य समन्‍वयक, आशा व आरोग्‍य स्‍वयंसेविका या आरोग्‍य केंद्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन ० ते २ वयोगटातील बालकांची तसेच गरोदर मातांची लसीकरणाबाबतची माहिती संकलित करीत आहेत.

"पटेल जिंकले तरी नेहरू PM कसे?" इतिहास सांगत अमित शहांचा काँग्रेसवर पलटवार

लाडक्या बहिणींना दिलासा; पात्र बहिणींसाठी योजना सुरूच राहणार, ८ हजार कर्मचाऱ्यांकडून रक्कम वसूल

‘५०% रक्कम भरा आणि दंड मिटवा’, सरकारचा मोठा निर्णय : दंडाची रक्कम FASTag मधून वसूल होणार

Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये आईनेच तब्बल ६ मुलांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस; जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

BCCI कडून अखेरच्या क्षणी IPL लिलाव यादीत मोठा बदल; माजी RCB खेळाडूसह नवीन ९ जणांचा समावेश