मुंबई

मेट्रो-३ प्रकल्पाच्या खर्चात झाली वाढ,ठाकरे सरकारवर फडणवीसांनी फोडले प्रकल्‍पाच्या किंमतवाढीचे अप्रत्‍यक्ष खापर

मेट्रो प्रकल्‍पाची २०१५ साली किंमत २३ हजार कोटी होती; मात्र कारशेडच्या वादावरून गेल्‍या दोन वर्षांत या प्रकल्‍पाचे काम रखडलेच होते

प्रतिनिधी

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मुंबई मेट्रो मार्ग-३ प्रकल्पाच्या खर्चात आता १० हजार कोटींनी वाढ झाली असून, सुधारित खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या प्रकल्‍पाचा मूळ खर्च २३ हजार १३६ कोटी होता; मात्र दोन वर्षे कारशेडच्या वादामुळे काम जवळपास ठप्पच होते. त्‍यामुळे प्रकल्‍पखर्च वाढला असून, आता तो ३३ हजार ४०५ कोटी ८२ लाख इतका झाला आहे. प्रकल्‍पाचा पहिला टप्पा कोणत्‍याही परिस्‍थितीत २०२३ साली सुरू करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्‍याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्‍पाच्या किंमतवाढीचे अप्रत्‍यक्ष खापर त्‍यांनी ठाकरे सरकारवरच फोडले.

या मेट्रो प्रकल्‍पाची २०१५ साली किंमत २३ हजार कोटी होती; मात्र कारशेडच्या वादावरून गेल्‍या दोन वर्षांत या प्रकल्‍पाचे काम रखडलेच होते. कारशेडच्या स्‍थगितीमुळे हा प्रकल्‍प पुढे गेला. प्रकल्‍प रखडल्‍याने आता त्‍याच्या किमतीतही वाढ झाली आहे.या प्रकल्‍पाचा पहिला टप्पा २०२१ साली पूर्ण व्हायला हवा होता. तर २०२२ मध्ये तो पूर्ण झाला पाहिजे होता. २३ हजार कोटींचा हा प्रकल्‍प आता जवळपास ३३ हजार कोटींचा झाला आहे. स्‍थापत्‍यकामे ८५ टक्‍के पूर्ण झाली आहेत. फक्‍त कारडेपोचे काम केवळ २९ टक्केच पूर्ण झाले आहे; मात्र आता हे काम वेगाने पूर्ण करून पहिला टप्पा कोणत्‍याही परिस्िथतीत २०२३ मध्ये पूर्ण झालाच पाहिजे, असे निर्देश देण्यात आल्‍याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई मेट्रो मार्ग-३ ची एकूण लांबी ३३.५ किमी असून, हा मार्ग संपूर्ण भुयारी आहे. या मार्गात २६ भुयारी आणि एक जमिनीवरील अशी २७ स्थानके असून, वर्ष २०३१ पर्यंत १७ लाख प्रवासी प्रतिदिन प्रवास करतील, असा अंदाज आहे. ही मार्गिका सुरू झाल्यानंतर नरिमन पॉईंट, वरळी, वांद्रे-कुर्ला संकुल व आंतरराष्ट्रीय व आंतरराज्य विमानतळ, मरोळ औद्योगिक वसाहत, सीप्झ अशी महत्त्वाची केंद्र मेट्रोने जोडली जातील.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक