मुंबई

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होणार ?

प्रतिनिधी

राज्य मंत्रिमंडळाचा विस्‍तार मंगळवारी होणार असल्‍याने रखडलेले विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. अधिवेशनाची तारीख ठरविण्यासाठी मंगळवारी विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक होत असून त्यात अधिवेशनाच्या तारखेवर शिक्कामोर्तब केले जाईल.

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्‍तार मंगळवारी होणार असून, त्यानंतर दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल. या बैठकीनंतर विधानभवनात कामकाज सल्‍लागार समितीची बैठक होऊन अधिवेशनाचे कामकाज निश्चित केले जाईल. या बैठकीसाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महाविकास आघाडीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पावसाळी अधिवेशन १८ जुलै २०२२ रोजी होईल, असे घोषित करण्यात आले होते; मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडामुळे आघाडी सरकार कोसळले आणि राज्यात शिंदे गट आणि भाजप यांचे सरकार आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशन लांबले. दरम्यान, विधिमंडळ सचिवालयाने सोमवारी कार्यालयीन आदेश जारी केला आहे. या आदेशात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १० ऑगस्टपासून प्रस्तावित असल्याचे म्हटले आहे; मात्र नवीन मंत्र्यांना तयारी करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून घेण्याचा निर्णय होण्याची शक्‍यता आहे. याबाबतचा अंतिम निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानमंडळ सचिवालयाने मंगळवारी मोहरमच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी आपले कार्यालय सुरू ठेवले आहे. तसेच ९ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत रजेवर असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द केल्या आहेत.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम