मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा बसणार आहे. मुंबईत ४८ ब्लॅक स्पॉट असून याठिकाणी दुभाजक, दिशादर्शक फलक, रस्त्यांवर थर्मोप्लास्टिक रंगपट्टे यासह वाहतूक बेट उभारण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका २२ कोटी ७ लाख ६७ हजार रुपये खर्च करणार आहे.
मुंबईच्या रस्त्यांवर वाढणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी अखेर महापालिका प्रशासनाने ४८ अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये विविध उपाययोजना करण्याची तयारी केली आहे. या कामांसाठी तब्बल २२ कोटी ७ लाख ६७ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दुभाजक बसविणे, रस्त्यांवर थर्मोप्लास्टिक रंगपट्टे आखणे, सूचना फलक लावणे, दिशादर्शक पृष्ठभाग निदर्शक बसविणे आणि वाहतूक बेटे उभारणे अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत. या कामांसाठी कंपनीची निवड करण्यात आली असून येत्या बुधवार, २८ ऑक्टोबर रोजी प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
मुंबईचे क्षेत्रफळ सुमारे ४७५ चौरस किलोमीटर असून, शहरातील रस्त्यांचे जाळे सुमारे दोन हजार किलोमीटर आहे. मात्र, मर्यादित रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. प्रमुख जंक्शन, उड्डाणपुलांचे चढ-उतार, पूर्व-पश्चिम जोडरस्ते आणि महामार्गाच्या प्रवेश-निर्गमन मार्गावर वाहतूककोंडीबरोबरच अपघातांचाही धोका वाढत आहे.
उपाययोजनांमुळे अपघातांना आळा
अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये वाहनचालकांना रस्त्याची दिशा, वाहतुकीचे नियम आणि धोकादायक वळणांची माहिती अधिक स्पष्टपणे मिळावी, या उद्देशाने उपाययोजना करण्यात येणार आहेत. रस्त्यांवर दुभाजक बसविणे, थर्मोप्लास्टिक रंगपट्टे आखणे, सूचना फलक उभारणे, दुहेरी दिशादर्शक पृष्ठभाग निदर्शक बसविणे आणि वाहतूक बेटांची उभारणी करणे, अशी कामे प्रस्तावित आहेत. मात्र, केवळ रंगपट्टे, फलक आणि दुभाजक उभारून अपघातांचा प्रश्न सुटणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संबंधित ठिकाणांवरील अपघातांची कारणे, वाहनांचा वेग, रस्त्यांची रचना, पादचाऱ्यांची सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण यांचा सखोल अभ्यास करून उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
महत्त्वाच्या जंक्शनवर लक्ष
अमर महल जंक्शन, टिळकनगर, कांजूरमार्ग येथील पूर्व पूर्व द्रुतगती महामार्ग आणि जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याचा छेदभाग, पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि शीव-वांद्रे जोडरस्त्याचा छेदभाग, घाटकोपर-अंधेरी जोडरस्ता आणि पूर्व द्रुतगती महामार्गाचा छेदभाग, प्रियदर्शिनी वाहतूक चौक, माटुंगा पूर्वेतील किंग्ज सर्कल, कुर्ला पश्चिमेतील सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्ता आणि लालबहादूर शास्त्री मार्गाचा छेदभाग, छेडानगर वाहतूक चौक, साकीनाका वाहतूक चौक, शीव-पनवेल महामार्ग आणि घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्याचा छेदभाग तसेच हाजी अली जंक्शन यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांचा या प्रस्तावात समावेश आहे.