Mumbai : अंधेरी सबवे तुंबल्याने नालेसफाईची पोलखोल; विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल 
मुंबई

Mumbai : अंधेरी सबवे तुंबल्याने नालेसफाईची पोलखोल; विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांचा हल्लाबोल

मुंबईत झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत झालेल्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या पावसाळापूर्व तयारीच्या दाव्यांची अक्षरशः पोलखोल केली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून नालेसफाई आणि जलनिस्सारण व्यवस्थेच्या सुधारणांचा गाजावाजा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे दावे पहिल्याच पावसात फोल ठरले आहेत, असा हल्लाबोल महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला.

पश्चिम उपनगरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा अंधेरी भुयारी मार्ग (सब वे) पहिल्याच पावसात जलमय झाला. त्यामुळे वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला आणि हजारो नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. अंधेरीपुरतीच ही समस्या मर्यादित नसून मुंबईतील अनेक भागांत रस्ते जलमय झाले, लोक वाहतूक कोंडीत अडकले आणि नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले, अशी टीका त्यांनी केली.

पावसाळ्यापूर्वी तयारीचे मोठमोठे दावे करणाऱ्या सत्ताधारी भाजपचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे. पहिल्याच पावसात मुंबईकरांची झालेली ही दुरवस्था म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि सत्ताधाऱ्यांच्या अपयशाचे जिवंत उदाहरण असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी गुरुवारी अंधेरी भुयारी मार्ग, मिलन भुयारी मार्ग आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. तसेच, नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. स्थानिक नगरसेवक प्रमोद सावंत यांच्यासह स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबईतील छोट्या-मोठ्या नाल्यांची १०० टक्क्यांहून अधिक साफसफाई झाल्याची आकडेवारी प्रशासन आणि भाजपमार्फत पुढे केली जात आहे. ही आकडेवारी किती फसवी आणि बोगस आहे, हे पहिल्याच पावसात सिद्ध झाले आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सदस्यांनी नालेसफाईचे दौरे केले. नालेस्वच्छतेबाबत समाधान व्यक्त केले, मात्र वस्तुस्थिती काय आहे, हे मुंबईकरांना माहिती आहे, असे पेडणेकर म्हणाल्या.

अधिकाऱ्यांवर कारवाई करा!

नाले अजूनही गाळाने भरले आहेत. जलपर्णी वाढली आहे. तरंगता कचरा जैसे थे आहे. कागदोपत्री नालेसफाई झाली आहे. खुद्द सभागृहनेते नालेसफाईवर नाराज आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी करत आहेत. एकूणच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये ताळमेळ नाही. त्याचा फटका मुंबईकरांना बसत आहे. नालेसफाई कामांच्या गुणवत्तेची चौकशी करावी. पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या नालेसफाईच्या कामांचे लेखापरीक्षण करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणीही किशोरी पेडणेकर यांनी केली.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग