मुंबई : ‘बेस्ट’ची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी तिकीट दरात दुपटीने वाढ करण्याच्या निर्णयास महापालिकेने नुकतीच मंजुरी दिल्यानंतर आता ही दरवाढ गुरुवारपासून अर्थात ८ मेपासून लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या बसचे किमान ५ रुपयांचे तिकीट १० रुपये होणार आहे, तर वातानुकूलित बसचे किमान तिकीट ६ रुपयांऐवजी १२ रुपये होणार आहे. बेस्ट बसचे दैनंदिन तिकीट ६० रुपयांवरून ७५ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईची दिवसभराची सफर आता ७५ रुपयांत होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे हाफ तिकीट पुन्हा सुरू करण्यात आले असून ५ ते १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हाफ तिकिटाचे पैसे मोजावे लागणार आहेत.
दरात वाढ करण्यास पालिका प्रशासनाच्या मंजुरीनंतर ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरिटी’कडे प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. पुढील दोन ते तीन दिवसांत ‘रिजनल ट्रॅफिक ऑथोरिटी’ने स्वाक्षरी केलेला प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ‘बेस्ट’ची भाडेवाढ एक-दोन दिवसात लागू करण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांत बेस्ट उपक्रमाला उतरती कळा लागली असून आर्थिक कोंडी दिवसेंदिवस वाढतच आहे. ही आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट दरवाढीचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र, राजकीय विरोधामुळे हा प्रस्ताव गुंडाळण्यात आला होता. यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाला गेल्या १० वर्षांत ११ हजार कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला मदतीपोटी द्यावे लागले. तरीही बेस्ट उपक्रमाची आर्थिक कोंडी फुटत नसल्याने आणखी पैशांची मागणी बेस्ट उपक्रमाने मुंबई महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र, मुंबई महापालिकेचीच आर्थिक घडी विस्कटल्याने पालिका प्रशासनाने हात वर केले व तिकीट दरवाढ करण्यास अखेर मंजुरी दिली.