मुंबई : गणेश विसर्जनानंतर मूर्तीचे विघटन, पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. या पुर्नप्रक्रिया साहित्यातून विविध नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगातील फिलर तयार केले जाणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची मार्गदर्शक तत्त्वे यांना अनुसरून मूर्ती विसर्जनानंतर कार्यवाही करण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या वर्षी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी)ठरवून दिली होती. यानुसार मूर्ती विसर्जन पश्चात विघटन, पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन विभागाने सर्व विभागीय सहाय्यक आयुक्तांना सविस्तर प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. त्यानुसार कृत्रिम तलाव, तात्पुरते विसर्जन तलाव आणि जलाशयांमध्ये विसर्जित केलेल्या मूर्ती २४ तासांच्या आत बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक वॉर्डने स्वतंत्र समन्वय अधिकारी, आवश्यक मनुष्यबळ, वैयक्तिक सुरक्षासाधने, क्रेन आणि योग्य प्रकारे आच्छादित वाहने उपलब्ध करावीत तसेच बाहेर काढलेल्या मूर्ती केवळ निश्चित केलेल्या मुलुंडमधील साठवण सुविधेपर्यंत सुरक्षितरीत्या पोहोचवण्याचेही कार्यपद्धतीत नमूद केले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी गणेशोत्सव विसर्जनानंतर महापालिकेने दोन हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त पीओपी अवशेष गोळा केले होते.
सगळ्याच्या नोंदी केल्या जाणार
संपूर्ण कार्यवाहीची विभागनिहाय नोंद, वजनकाट्याच्या पावत्या तसेच छायाचित्रे आणि व्हिडीओ नोंदी जतन करणेही संबंधित पुनर्प्राप्ती आणि पुनर्प्रक्रिया संस्थेला या प्रमाणित कार्यपद्धतीत बंधनकारक करण्यात आले आहे. तर संबंधित सहायक आयुक्त यांनी या दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवण्याचेही स्पष्ट केले आहे.
पुनर्वापरावर भर
यंदाही महापालिकेने सुमारे २ हजार ८५० मेट्रिक टन पीओपी गणेशमूर्तींच्या साहित्यावर शास्त्रीय प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी अनुभवी संस्था आणि तंत्रज्ञान पुरवठादारांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवली आहे. संस्थांकडून प्रक्रिया केलेल्या साहित्याचा नवीन मूर्ती, प्लास्टर बोर्ड, सिरॅमिक, वैद्यकीय प्लास्टर, विटा किंवा सिमेंट उद्योगातील फिलर म्हणून पुनर्वापर करता येऊ शकणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.