मुंबई

मुंबई उपनगरांतील शौचालयांची कामे प्रगतिपथावर; पहिल्या टप्प्यात ८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती

Swapnil S

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील रहिवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर सुरू आहेत. या अंतर्गत पहिल्या टप्प्यातील ८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची पुनर्बांधणी करण्यात येत आहे. यावर आधारित माहिती पुस्तिका व अहवालाचे प्रकाशन मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुंबई उपनगरे जिल्हाधिकारी राजेश क्षीरसागर, उपजिल्हाधिकारी संदीप निशीत, उपआयुक्त विश्वास शंकरवार, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, प्रमुख अभियंता प्रशांत तायशेटे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

म्हाडा प्राधिकरणाने मुंबईत बांधलेली शौचालये मुंबई पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. या शौचालयांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीची कामे सुरू आहेत. मुंबई उपनगरांतील शौचालयांची कामे प्रगतिपथावर असून ८५ टक्के शौचालयांची दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची पुनर्बांधणी केली जाणार आहे. म्हाडाकडील ३९१३ पैकी २९८७ सार्वजनिक शौचालये महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहेत. यासाठी मुंबई उपनगरे जिल्हा नियोजन समितीकडून १८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालिकेने पहिल्या टप्प्यात २९८७ पैकी १५०४ शौचालयांची कामे हाती घेतली आहेत. त्यापैकी ८५ टक्के शौचालयांची (१२७७) दुरुस्ती आणि १५ टक्के शौचालयांची (२२७) पुनर्बांधणीची कामे प्रगतिपथावर आहेत.

वस्ती सुधार योजनेची कामेही प्रगतिपथावर

मुंबई उपनगरे जिल्ह्यातील सार्वजनिक शौचालयात सध्या ७००४ इतकी शौचकुपे आहेत. मुंबई महानगरपालिकेने वस्ती सुधार योजनेची लॉट १२ अंतर्गत देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेतल्यानंतर हा आकडा ७००४ वरून ११ हजार ७६९ पर्यंत नेण्यात येणार आहे. यासह सार्वजनिक शौचालये स्वच्छ ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन प्रयत्नशील असल्याचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

अशा असणार सुविधा

आरसीसी प्रकारच्या शौचालयांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. येत्या २४ महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. झोपडपट्ट्यांतील नागरिकांसाठी सुविधा शौचालयांची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन, सौरऊर्जा, स्नानगृहे, स्वतंत्र शौचकुपे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत. मुंबई उपनगरातील सांस्कृतिक, धार्मिक आणि पर्यटनस्थळी उच्च दर्जाच्या सुविधा असलेली शौचालयेदेखील या प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणार आहेत.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त