Mumbai : चेंबूर दुर्घटना काँक्रीटीकरणामुळेच; चौकशी समितीच्या अहवालात ठपका, आज पालिकेत निवेदन  (Photo-X)
मुंबई

Mumbai : चेंबूर दुर्घटना काँक्रीटीकरणामुळेच; चौकशी समितीच्या अहवालात ठपका, आज पालिकेत निवेदन 

चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर झाड कोसळण्यास सिमेंट काँक्रीटचा रस्ताच कारणीभूत ठरला, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे.

गिरीश चित्रे

गिरीश चित्रे / मुंबई 

चेंबूर येथे स्कूल व्हॅनवर झाड कोसळण्यास सिमेंट काँक्रीटचा रस्ताच कारणीभूत ठरला, असा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. शुक्रवारी होणाऱ्या सभागृहात पालिका प्रशासन निवेदन सादर करणार असल्याचे समजते.

या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी) पुरुषोत्तम माळवदे, उपायुक्त (अभियांत्रिकी) शशांक भोरे यांची समिती गठित करण्याचे निर्देश दिले होते. समितीचा अहवाल आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

यानुसार, चौकशी समितीसह वृक्ष तज्ज्ञांनी घटनास्थळी दोन वेळा झाडाझडती घेतली. चेंबूर येथील ११ व्या रोडवर असलेले पिंपळाचे झाड ६० वर्षे जुने असून झाडांच्या भोवती सिमेंट काँक्रीट असल्याने झाड आतून कमकुवत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. एरव्ही गावांमधील झाडांची मुळे मजबूत असल्याने ती पडत नाहीत, असे या अहवालात म्हटले आहे.

चेंबूर घटनेनंतर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांमुळे झाडांना धोका निर्माण झाला, अशी टीका मुंबई महापालिकेवर होऊ लागली. मात्र सीसी रस्ते आणि झाड यात अंतर असते. त्यामुळे सीसी रस्त्यांमुळे झाडांना धोका नाही, असा दावा मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. मात्र आयुक्तांचा दावा खोडून काढत केवळ वृक्षछाटणीला जबाबदार धरणे योग्य नसून, शहरातील वाढते काँक्रिटीकरण हे झाडे उन्मळून पडण्यामागील प्रमुख कारण असल्याचे महापौर रितू तावडे यांनी बुधवारी म्हटले होते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारची पालिकेची सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

चेंबूर येथे शालेय बसवर ३० जून रोजी पिंपळाचे ६० वर्षे जुने झाड कोसळून विहान श्रीवास्तव (११) मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेत जबाबदार योगेश पोर्टे, सहाय्यक अभियंता, रस्ते विभाग, एम पूर्व, अरुण मंढे, दुय्यम अभियंता , रस्ते विभाग व  जगदीश भाईर, सहाय्यक उद्यान अधीक्षक या तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

काँक्रीटीकरण नको

मुंबईत सिमेंटच्या रस्त्यांचे जाळे विस्तारले जात असून झाडांच्या मुळापर्यंत पाणी, माती पोहोचत नसल्याने झाडांना हानी पोहोचते, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे. झाडांच्या मुळाभोवती सिमेंट काँक्रीटीकरण नको, असे अहवालात सूचित करण्यात आले आहे.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग