मुंबई : मुंबईत भक्तिमय वातावरण निर्माण झाले असताना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मंडपाची उंची नियमाप्रमाणे असणे गरजेचे आहे तसेच मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपाचे थर्ड पार्टी ऑडिट करत स्ट्रक्चरल स्टॅबेलिटी (बांधकाम स्थिरतेचे प्रमाणपत्र) रिपोर्ट सादर करणे बंधनकारक असणार आहे तसेच मंडप परिसरात खड्डे निदर्शनास आल्यास प्रति खड्डा दोन हजार रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिका प्रशासनाने दिला आहे.
दोन दिवसांवर बाप्पाचे आगमन होणार असून गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व घराघरात बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मुंबईत गणेशोत्सवाची धूम वेगळीच असते. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून भक्त मुंबईत येत असतात. दरम्यान, मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्यावर भर दिला जात असताना मंडपात खड्डा आढळल्यास प्रती खड्डा दोन हजार रुपये प्रमाणे दंड वसूल करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.
मंडळांना बांधकाम स्थिरतेचे प्रमाणपत्र
मूर्तीच्या उंचीवर बंधन नसले तरी मंडपाच्या उंचीवर मात्र बंधन घालण्यात आले आहे. एखाद्या मंडपावरून केबल किंवा अन्य काही अडथळा येत असल्यास तेथील परिस्थितीनुसार मंडपाची उंची असणार आहे. परंतु लालबाग, गणेश गल्ली, चिंतामणी या मोठ्या मंडळांच्या मंडपाची उंची अधिक असते. या मंडळांना स्थिरतेचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
अनामत रक्कम जप्त करणार
मुंबई महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून अटी-शर्तींचे उल्लंघन आढळल्यास अनामत रक्कम जप्त करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वाहने, पादचाऱ्यांसाठी जागा राखीव
रेल्वे स्थानक, बस थांबे, रिक्षा व टॅक्सी थांबे या ठिकाणी पादचारी व वाहनधारकांची ये-जा होत असते. त्यामुळे या ठिकाणी मंडप उभारताना वाहने व पादचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
...तर मंडळांवर कारवाई
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावणाऱ्या मंडळांवर पालिकेच्या अनुज्ञापन विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल, असे अनुज्ञापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मंडप परिसरात पालिकेने तयार केलेल्या लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक प्रदर्शित करता येईल. मलेरिया, लेप्टो, डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू साथीच्या आजारांचा धोका वाढला असून मंडप परिसर स्वच्छ ठेवणे ही मंडळाची जबाबदारी असणार आहे.