मुंबई : गणेश विसर्जनानंतर समुद्रकिनारे आणि विसर्जनस्थळांवर साचणारे निर्माल्य, प्लास्टिक आणि थर्माकोल हटविण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील सुमारे दीड हजार राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) स्वयंसेवक मैदानात उतरतात. ‘निर्माल्य मुक्ती’ उपक्रमांतर्गत निर्माल्य जमा करण्याबरोबरच त्यातील प्लास्टिक आणि थर्माकोल वेगळे करून फुलांपासून कंपोस्ट खत तयार करण्यात येत आहे. हे खत उद्यानासाठी वापरण्यात येत आहे.
शहर आणि उपनगरात दीड दिवस,पाच दिवस, सात दिवस ते दहा-अकरा दिवशी गणपतीचे विसर्जन होते. या कालावधीत एनएसएसचे विद्यार्थी तैनात केले जातात. हे स्वयंसेवक भाविकांकडून निर्माल्य संकलित करतात. हे निर्माल्य निर्माल्य कलशांमध्ये जमा केले जाते. त्यासोबतच विसर्जनानंतर समुद्रकिनारे आणि परिसराची स्वच्छता करण्याचेही काम हे विद्यार्थी दरवर्षी करत असतात. स्वछता मोहिमेवेळी प्लास्टिक व अन्य कचरा वेगळा केला जातो. काही ठिकाणी विसर्जन व्यवस्थित झाले नसलेल्या मूर्तींचे पुन्हा विधिवत विसर्जन करण्याची जबाबदारीही स्वयंसेवक पार पाडतात.
ठाकूर महाविद्यालयात गेल्या सहा वर्षांपासून निर्माल्यापासून कंपोस्ट खत तयार करण्याचा उपक्रम सुरू आहे. महापालिकेकडून मालाड येथे निर्माल्य संकलनासाठी जागा उपलब्ध करून दिली जाते.
जमा झालेले निर्माल्य एकत्र करून त्यातील प्लास्टिक, थर्माकोल आणि अन्य घटक वेगळे केले जातात. त्यानंतर जैविक घटकांवर प्रक्रिया करून साधारण ३५ ते ४० दिवसांत कंपोस्ट खत तयार केले जाते. गेल्या वर्षी सुमारे ३०० किलो खत तयार झाले होते. हे खत महापालिकेला देण्यात येते किंवा महाविद्यालयातील उद्यानांसाठी वापरले जाते.
प्लास्टिकचे आव्हान
मात्र निर्माल्याबरोबर येणाऱ्या प्लास्टिक आणि थर्माकोलचे प्रमाण वाढत असल्याने विद्यार्थ्यांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. आठ ट्रक निर्माल्य जमा झाल्यास त्यातील केवळ दीड ट्रकपर्यंतच प्रत्यक्ष फुले असतात. तर उर्वरित निर्माल्यात प्लास्टिक व थर्माकोलचे प्रमाण मोठे असल्याचे, राष्ट्रीय सेवा योजना मुंबई विद्यापीठ विशेष कार्य अधिकारी सुशील शिंदे यांनी सांगितले.
ठाकूर महाविद्यालय आणि मालाड अशा दोन ठिकाणी हा उपक्रम राबविला जातो. मात्र निर्माल्य संकलन केंद्रांसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर विस्तारण्यात अडचणी येत आहेत. तरीही गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने एनएसएस विद्यार्थी सहभागी होत असून, निर्माल्याचे योग्य व्यवस्थापन आणि विसर्जनस्थळांची स्वच्छता यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.